सातारा - जनता 2014 ला जाहिराती बघून फसली. जाहिराती बघून तेल आणि साबण घ्यायचा असतो, मतदान करायचे नसते, हे आता जनतेच्या लक्षात आले आहे. युतीने कर्जमाफी केली. तीही सरसकट नाही, तर 66 अटी घालून केली. कर्जमाफीची पोकळ घोषणा करून हे सरकार शेतकऱ्यांना खेळवतंय. परंतु, याद राखा...मौका सभी को मिलता है! असा इशारा राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिला.
ढेबेवाडी येथे पाटण मतदार संघातील महाआघाडीचे उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर यांच्या प्रचार सभेत अमोल कोल्हे बोलत होते. 1 हजार 800 कोटींचा विकास झाल्याचे कागदावर सांगू नका. प्रत्यक्षात विकास दाखवा, असा शंभूराजेंना टोला मारून श्रीनिवास पाटील, सत्यजितसिंह पाटणकर या दोघांना विजयी करण्याचे आवाहन कोल्हेंनी केले.
हेही वाचा - महाराष्ट्रात सरकारची कोट्यावधींच्या घोटाळ्यांची उड्डाणे; अनंत गाडगीळांचा हल्लाबोल
यावेळी कोल्हे म्हणाले, एकदा चूक झाली, ती सुधारण्याची संधी 5 वर्षांनी येते. परंतु, तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत झालेली चूक सुधारण्याची संधी 6 महिन्यांतच आली आहे. महाराष्ट्रात रोजगार निर्मिती थांबली आणि देशाचा विकास दर घसरत चालला आहे. हीच का सरकारची उभारी? माझ्यासमोर कोणी पैलवानच नाही, असे मुख्यमंत्री म्हणतात. मग पंतप्रधान, अमित शाह, योगी आदित्यनाथ यांच्या सभा का घेत आहात, असा सवाल कोल्हे यांनी केला.
हेही वाचा - राष्ट्रवादी संपवण्याच्या नादात पृथ्वीराज चव्हाणांनी काँग्रेस संपवली; उंडाळकरांचे टीकास्त्र
लोकांनी मला आत्तापर्यंत लाखमोलाची साथ दिली असल्याचे सांगून श्रीनिवास पाटील म्हणाले, पाटण तालुक्यात विक्रमसिंह पाटणकर यांनी पर्यटन विकास, नवीन महाबळेश्वर, कारखान्यासह छोट्या-मोठ्या उद्योगधंद्यांची निर्मिती केली आहे. आमचं वयं तुम्ही कशाला विचारता? जनतेने प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिल्यानंतर मी आणि विक्रमसिंह पाटणकरांनी ती जबाबदारी चोखपणे बजावली. आता मला आणि सत्यजितसिंह पाटणकरांना पुन्हा संधी द्या. पाटण तालुक्याचा आणखी कायापालट करून दाखवितो, असा शब्द त्यांनी दिला.
हेही वाचा - दुष्काळमुक्तीसह बेरोजगारी संपवून महाराष्ट्र समृद्ध करायचाय - बानगुडे पाटील
यावेळी पाटण पंचायत समितीच्या सभापती उज्वला जाधव, काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदूराव पाटील, सुजित पाटील, यशस्विनीदेवी पाटणकर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, सह्याद्री कारखान्याचे माजी संचालक निवासराव पाटील, अॅड. अविनाश जानुगडे, माजी सभापती संगीता गुरव, काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा वंदना आचरे, रमेश मोरे, योगेश पाटणकर, पंचायत समिती सदस्या सुरेखा पाटील, सुनंदा पाटील, डॉ. महेंद्र पाटील उपस्थित होते.