सातारा - महाराष्ट्रात पंधरा वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते. त्यावेळी सिंचनासाठी अजित पवारांनी 70 हजार कोटी रूपये खर्च केले. मग पाणी कुठे गेले असा सवाल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांना केला. भाजप-शिवसेना महायुतीचे दक्षिण-कराडमधील उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचारासाठी अमित शाह यांची शिवाजी स्टेडियमवर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा - 'यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रात अच्छे दिन शोधावे लागत आहेत'
शाह पुढे म्हणाले, की छत्रपती उदयनराजेंनी सांगितले की, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या पंधरा वर्षाच्या काळात कृष्णा खोरे विकास महामंडळाची कामे ठप्प होती. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर ती पुन्हा सुरू झाली. आता एक-दीड वर्षाच्या आत सगळीकडे पाणी पोहोचण्यास सुरूवात होईल. पंधरा वर्षे केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले ? असे मी त्यांना विचारू इच्छितो. पृथ्वीराज चव्हाण मते मागायला आल्यानंतर कराडकरांनी त्यांना विचारावे, की पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री असताना तुम्ही महाराष्ट्रासाठी काय केले, त्याचा हिशोब द्या, असे आवाहनही त्यांनी केले. ते हिशोब घेऊन आले तर आमच्या नेत्याला त्यांच्यासमोर यायची गरज नाही. त्यांनी सातारच्या कुठल्याही गल्लीत उभे रहावे. माझा युवा मोर्चाचा कार्यकर्ता त्यांना हिशोब समजावून सांगेल, असे ते म्हणाले.
हेही वाचा - स्वच्छ प्रतिमेमुळे पृथ्वीराज चव्हाणांचा विरोधकांवर धाक - आमदार विश्वजीत कदम
एका बाजूला काँग्रेसची 50 वर्षांच्या सत्तेची कारकीर्द आणि दुसर्या बाजूला मोदींच्या 5 वर्षांची तुलना केली तरी आमचेच पारडे जड दिसेल. तसेच मनमोहन सिंग-शरद पवारांच्या सरकारने 13 व्या वित्त आयोगातून महाराष्ट्राला 1 लाख 15 हजार 539 कोटी रूपये दिले. मात्र, 2014 ला मोदी सरकारने 14 व्या वित्त आयोगातून 2 लाख 86 हजार 354 कोटी रूपये देण्याचे काम केले. काश्मिर हा भारताचा अविभाज्य भाग नव्हता. म्हणून 370 कलम हटवून मोदींनी काश्मिरला भारताचा अविभाज्य भाग बनविले. गेल्या 70 वर्षात किती पक्ष, किती पंतप्रधान सत्तेवर आले. मात्र, 370 कलमला हात लावण्याची कोणाची हिम्मत झाली नाही. तुम्ही 56 इंचाची छाती असलेला पंतप्रधान निवडून दिला. त्यांनी 370 कलम हटविले, असे सांगत त्यांनी आपल्या सरकारचा कित्ता गिरवला.
तर महाराष्ट्राचा आणि 370 कलमाचा काय संबंध ? भाजपचे प्रदेशाध्यक्ष त्याचा इथे उल्लेख का करतात, असे काँग्रेसवाले विचारत आहेत. आता मते मागायला पृथ्वीराज चव्हाण आल्यानंतर तुम्ही 370 च्या बाजूचे की विरोधातील ? हे त्यांना विचारा, असेही शहा म्हणाले. 370 कलमच नव्हे, तर तिहेरी तलाक कायदा रद्द केला तेव्हाही काँग्रेसच्या पोटात दुखल्याचा टोला त्यांनी मारला. आता 2014 पूर्वी आम्ही देशात एकही घुसखोर शिल्लक ठेवणार नाही. वेचून-वेचून त्यांना देशाबाहेर काढणार असल्याचेही ते म्हणाले.