सातारा - शनिवारी राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी केलेल्या उमेदवारी अर्जाची छाननी केली. यामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्वच पक्ष, अपक्ष उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. सोमवारी (दि.7 ऑक्टोबर) दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. अशी माहीती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी श्रीरंग तांबे व सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार रवींद्र माने यांनी दिली.
शनिवारी सकाळी ११ वाजता निवडणूक कार्यालयात श्रीरंग तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी झाली. यावेळी काही उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, तसेच कायदेतज्ञही उपस्थित होते. अतिशय शांततेत व खेळीमेळीच्या वातावरण ही छाननी प्रक्रिया पार पडली. दाखल केलेले सर्वच अर्ज वैध असल्याचे जाहीर करण्यात आले.
हेही वाचा - विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यात सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधींच्या १५ सभा
हेही वाचा - MAHA VIDHAN SABHA : आघाडीची सत्ता संपुष्टात.. युतीचे 'कमबॅक', लाखोंचे 'मराठा' मार्चे अन् भीमा-कोरेगाव दंगल
या निवडणुकीसाठी प्रमुख उमेदवार म्हणून सेना भाजप महायुतीतून आमदार शंभूराज देसाई व राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेस मित्र पक्ष महाआघाडीतून सत्यजीतसिंह पाटणकर यांनी आपले अर्ज भरले आहेत. याशिवाय अपक्ष म्हणून सुरेश राजाराम संकपाळ, अजीतकुमार दिनकरराव मोहिते, सुभाष तानाजी देसाई, सागर लक्ष्मण जाधव, विजयकुमार मारूती सुर्वे, प्रकाश सदाशिवराव पवार यांनी तर वंचित बहुजन आघाडीतून अशोकराव तातोबा देवकांत, स्वराज्य सेना ( महाराष्ट्र ) यांच्याकडून सयाजीराव दामोदर खामकर, बसपातून शिवाजी भिमाजी कांबळे. भाजपचे बंडखोर उमेदवार तथा पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक बंडू महाडिक, संभाजी ब्रिगेड पार्टीकडून शरद हणमंत एकावडे यांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.
या निवडणुकीसाठी सेना, भाजप महायुती, राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेस मित्र पक्ष महाआघाडी, बसपा, संभाजी ब्रिगेड पार्टी, वंचित बहुजन आघाडी, स्वराज्य सेना अशा पक्ष संघटनांच्या ६ उमेदवारांनी एकूण १३ तर ७ अपक्षांचे ७ अशा एकूण १३ उमेदवारांचे २० अर्ज दाखल झाले आहेत. सोमवार दि. ७ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज माघारी घेता येणार असल्याचे श्रीरंग तांबे व रविंद्र माने यांनी स्पष्ट केले.