सातारा - पत्रकारांच्या प्रश्नांबाबत महाविकास आघाडीतील सर्व घटक एकत्र बसून निर्णय घेतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. ते साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
साताऱ्यात 7 पत्रकारांचा कोरोनाने मृत्यू
अजित पवार कोविड संदर्भातील आढाव्यासाठी सातारा दौर्यावर आले होते. यावेळी सातार्यातील पत्रकारांनी आमचे निवेदन ऐका, अशी भूमिका घेतली. यावेळी सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे यांनी कोरोनामुळे राज्यातील सुमारे 140 पत्रकारांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तसेच सातारा जिल्ह्यातही 7 पत्रकारांचा मृत्यू झाला असल्याचे अजित पवारांच्या निदर्शनास आणून दिले.
'कोरोनामृत पत्रकारांच्या कुटुंबीयांना मदत द्या'
'पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा न मिळाल्याने त्यांच्या लसीकरणामध्ये अडथळे येत आहेत. देशातील 12 राज्यांनी पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देवून सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. राज्यातील अनेक पत्रकारांची कुटुंबे बाधित आहेत. त्यामुळे पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून त्यांचे सरसकट लसीकरण करण्याचे आदेश द्यावेत. मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना अर्थिक मदत द्यावी. प्रसार माध्यमांमधील सर्व घटकांना तातडीने बेड उपलब्ध व्हावेत', अशी मागणीही हरिष पाटणे यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली.
यावेळी, पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्याच्या मागणीचे निवेदन सातारा जिल्हा पत्रकार संघाने उपमुख्यमंत्र्यांना दिले.
दरम्यान, पत्रकारांच्या समस्या आणि मागण्या ऐकल्यानंतर अजित पवार यांनी महाविकास आघाडीतील सर्व घटक एकत्र बसून निर्णय घेऊ, अशी ग्वाही दिली.
हेही वाचा - जळगावात भाजपला पुन्हा धक्का; 3 नगरसेवक शिवसेनेत दाखल, आणखी 5 वाटेवर