कराड (सातारा) - सिक्किमचे राज्यपाल असताना खा. श्रीनिवास पाटील हे पीपल्स गव्हर्नर ठरले होते, अशा शब्दात श्रीनिवास पाटलांचे कौतुक करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा नामोल्लेख टाळून त्यांना चिमटा काढला.
खा. श्रीनिवास पाटील यांच्या कराड-गोटे येथील आपल्या निवासस्थानी सुरू केलेल्या लोकसेवा जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी अजित पवार बोलत होते. खा. श्रीनिवास पाटील यांनी 1999मध्ये खासदार झाल्यापासून लोकसभा मतदारसंघातील नागरिकांची सेवा केली आहे. लोकप्रिय खासदार म्हणून श्रीनिवास पाटील यांना ओळखले जाते, असे अजित पवार म्हणाले.
सिक्किमचे राज्यपाल असताना सर्वसामान्यांसाठी त्यांनी राजभवनाचे दरवाजे खुले केले होते. त्यामुळे, त्यांना पीपल्स गव्हर्नर म्हटले जाते. सातारा लोकसभा मतदारसंघातील जनतेने त्यांना पुन्हा एकदा संसदेत काम करण्याची संधी दिली आहे. त्यानुसार ते लोकांचे प्रश्न सातत्याने मांडत असतात, असेही अजित पवार म्हणाले.
सातारा लोकसभा मतदार संघ हा भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे. त्यामुळे, नागरिकांना आपल्या अडचणी मांडता याव्यात आणि सरकारच्या माध्यमातून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी, म्हणून खा. श्रीनिवास पाटील यांनी लोकसेवा जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयामुळे सामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक होईल, असे पवार म्हणाले.
याप्रसंगी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माहिती-तंत्रज्ञान सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, पाटणचे राष्ट्रवादी नेते सत्यजितसिंह पाटणकर, सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, कराड पंचायत समितीचे सभापती प्रवीण ताटे उपस्थित होते.
हेही वाचा - वाहन चालकास चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोघांना अटक, एक अल्पवयीन ताब्यात