सातारा : तीन बिबटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने कराड तालुक्यातील वराडे गावातील ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. या प्रकरणी भाजपचे माजी कराड उत्तर तालुका प्रमुख अॅड. महादेव साळुंखे यांनी थेट वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना फोन करून संपूर्ण घटनेची माहिती दिली. यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने दखल घेत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
साहेब, बिबट्याचा बंदोबस्त करा : साहेब बिबट्याचा बंदोबस्त करा, अशी मागणी अॅड. महादेव साळुंखे यांनी वनमंत्री मुनगंटीवारांना केली आहे. बिबटे नागरी वस्तीत घुसले आहेत. तरी देखील वन अधिकारी उपाययोजना करण्यास टाळाटाळ करत असल्याची तक्रार साळुंखे यांनी केली. त्यांच्या मागणीची दखल घेत वन अधिकाऱ्यांना मी सूचना करतो, असे आश्वासन मंत्री मुनगंटीवार यांनी दिले.
ग्रामस्थ सातच्या आत घरात : वराडे गावात घुसलेल्या बिबट्यांनी तीन दिवसात गावातील काही श्वानांची शिकार केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ग्रामस्थ रात्री सातच्या आत घरी परतत आहेत. तरी देखील वन विभागाकडून बिबट्याचा बंदोबस्त केला जात नसल्याने भाजप कराड उत्तरचे माजी अध्यक्ष ॲड. महादेव साळुंखे यांनी शुक्रवारी थेट वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांनाच फोन केला.
वन रुग्णालयाभोवती बिबट्यांचा वावर : वराडे गावात वन खात्याचे कार्यालय असून त्याठिकाणी जखमी वन्य जीवांवर उपचार करण्यासाठी रुग्णालय उभारण्याचे काम सुरु आहे. त्या रुग्णालयाभोवती तीन बिबटे फिरत आहेत. या बिबट्यांना पकडण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सूचना द्याव्यात तसेच या ठिकाणी पिंजरे लावून त्यांना तात्काळ जेरबंद करावे, अशी मागणी ॲड. महादेव साळुंखे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली. त्याच्या मागणीची दखल घेत मंत्री मुनगुंटीवार यांनी वन विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना तातडीने सूचित करण्याची ग्वाही दिली.
ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली : साताऱ्यातील वराडे गावात एकाच वेळी तीन बिबट्या घुसले. तीनही बिबट्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. गावात शिरताच बिबट्याने पाळीव श्वानाचा फडशा पाडाला आहे. त्यामुळे वराडे ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत.
हेही वाचा - leopards entered In village: बिबट्या आला रे आला! गावात घुसले तब्बल तीन बिबटे, पाहा व्हिडिओ