सातारा - अस्मानातून धो-धो कोसळणाऱ्या पावसाने सातऱ्यात थैमान घातले होते. या पावसाने येथे हाहाकार माजवला होता. पूरग्रस्तांचे सर्वस्व हिरावून घेतले होते. पण तेच पाणी जोर गावच्या ग्रामस्थांसाठी वरदायीनी ठरले. जोर गावाकडे जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावरील तीन पूल वाहून गेले होते आणि चार- पाच ठिकाणी मोठ्या दरडी कोसळल्याने रस्ते बंद झाले होते. दरम्यान, प्रशानसनाला ग्रामस्थांना मदत पोहचवण्यात मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला होता. यावर उपाय करताना आणि ग्रामस्थांना जलद मदत पोहोचवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी चक्क पुराचे पाणी कापत बोटीतून प्रवास केला. पूरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना अन्नधान्य व इतर प्रापंचिक साहित्य पोहोचवले आहे.
पश्चिम भागाला अतिवृष्टीचा तडाखा
सातारा जिल्ह्यात पाटण खालोखाल वाई तालुक्याच्या पश्चिम भागाला अतिवृष्टीने जोरदार तडाखा दिला. जिल्ह्यात भूस्खलनाची पहिली घटना कोंढावळे (ता. वाई) गावात घडली. गावातील तिघांचा यात बळी गेला. जोर येथील दोघे ढिगाऱ्याखाली गाडले जाऊन बेपत्ता झाले. जांभळी येथेही भूस्खलन झाले. अतिवृष्टीने कोंडावळे गावातील 27 घरांचे नुकसान केले. मेणवली येथील 20 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. सर्व ठिकाणचे पंचनामे अंतिम टप्प्यात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
रस्त्यात अडचणींचा डोंगर -
'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने वाई तालुक्याला भेट देऊन सत्यस्थिती तपासली. 21 ते 24 जुलैच्या पावसाने वाई तालुक्याला थैमान घातले होते. घरांसह माणसे मातीत गाडली गेलीच पण रस्त्यावरील पूल तुटल्याने पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे रस्ते दुभंगले होते. काही ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. रस्त्यांवरून पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की माणसाने चालत पलीकडे जाणेही मुश्कील होऊन बसले होते. अशा परिस्थितीत ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या लोकांना रेस्क्यू करत असतानाच पावसाने संसार धुऊन नेलेल्या लोकांना जीवनावश्यक धान्य, रॉकेल, कोरडे खाद्य पदार्थ, कपडे आदी पोहोचविण्याची जबाबदारी प्रशासनाच्या शिरावर होती.
घरांबरोबरच शेतीचेही मोठे नुकसान -
जोर भागात 142 कुटुंबे बाधित होती. दळणवळणाची पारंपारिक साधने निरुपयोगी ठरल्याने प्रशासनाने बोटीने जाण्याचा निर्णय घेतला. बोटीच्या फेर्या वाढवत प्रांत अधिकारी संगीता राजापूरकर व तहसीलदार रणजित भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी तांदूळ, गहू, तूरडाळ, रॉकेल आदी साहित्य बाधितांपर्यंत पोहोच केले आहे. "कोंडावळेमधील सात घरांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे लागणार आहे. धोकादायक स्थितीमुळे उर्वरित कुटुंबे तात्पुरती स्थलांतरित करण्यात आली आहेत. वाई तालुक्यातील 130 घरांची पडझड झाल्याने ती अंशत: बाधित आहेत," असे तहसीलदार रणजित भोसले यांनी सांगितले.
जिल्ह्यातील मदत कार्यावर एक नजर -
पूरबाधित, अतिवृष्टीमुळे भूस्खलन बाधित 5 हजार 703 कुटुंबातील 26 हजार 128 व्यक्तींना जिल्हा प्रशासनामार्फत अन्नधान्य व केरोसीन वाटप सुरू आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा देवकाते यांनी दिली. पूरबाधितांमध्ये वाई तालुक्यातील 290 कुटुंबांची संख्या असून 1 हजार 503 व्यक्तींची संख्या आहे. कराड तालुक्यातील 1 हजार 411 कुटुंबातील सहा हजार 155, पाटण तालुक्यातील 2 हजार 425 कुटुंबातील दहा हजार 307, महाबळेश्वर तालुक्यातील 73 कुटुंबातील 260, जावळी तालुक्यातील 1 हजार 750 कुटुंबातील सात हजार 691 व सातारा तालुक्यातील 44 कुटुंबातील 212 व्यक्ती अशा पद्धतीने जिल्हा प्रशासनाकडून अन्नधान्य व केरोसिनचे वाटप सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
वाई तालुक्यातील बाधित कुटुंबे -
- जोर 142
- गोळेवाडी 64
- कोंडावळे 29
- मेनवली 20
- गोळेगाव 17
- पाचवड 9
- जांभळी 3
एकूण 284 कुटुंबे बाधित झाले आहेत.