सातारा : महाराष्ट्राच्या 17 वर्षीय अदिती स्वामी हिने इतिहास रचला आहे. हैदराबादमधील राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक सिल्व्हर मेडल पटकावणार्या सातार्याच्या आदिती स्वामीने नुकतेच बर्लिनमधील जागतिक आर्चरी स्पर्धेत अवघ्या 17 व्या वर्षी वैयक्तिक सुवर्णपदक पटकावत जागतिक यशाला गवसणी घातली आहे.
उन्हाळी शिबीरापासून सुरूवात : क्रीकेट, टेनिस, बास्केटबॉल, फुटबॉल, हॉकी हे जगभरातील पॉप्युलर गेम्स आहेत. त्या तुलनेत आर्चरीसारखा क्रीडा प्रकारात रस घेणारे फारच कमी. मात्र, सातारची कन्या आदितीने सुवर्णमय कामिगरी करत आर्चरी क्रीडा प्रकाराला देखील लौकीक प्राप्त करून दिला आहे. 2016 मध्ये गोपीचंद स्वामी हे आदितीला उन्हाळी सुट्टीतील शिबिरात प्रवेश घ्यायला सातारच्या शाहू स्टेडियमवर गेले होते. तुला कोणता गेम आवडतो त्याला प्रवेश घे, असे वडिलांनी आदितीला सांगितले. तिने आर्चरी क्रीडा प्रकार निवडला. प्रशिक्षक प्रवीण सावंत यांना तिची इच्छा सांगितली. प्रशिक्षकांनी तिची पंधरा दिवस चाचणी घेतली आणि तिला प्रशिक्षण देण्याची तयारी दाखवली.
प्रशिक्षकांचा विश्वास सार्थ ठरला : आदितीच्या आर्चरी प्रशिक्षणाचा प्रवास साताऱ्याच्या शाहू स्टेडियमवर सुरू झाला. त्याची आठवण गोपीचंद स्वामी यांनी सांगितली. अदितीच्या प्रशिक्षणाला पंधरा दिवस झाल्यानंतर प्रशिक्षक प्रवीण सावंत यांनी मला बोलावून घेतले. तुमची मुलगी एक दिवस नॅशनल चॅम्पियन बनेल, असे ते म्हणाले. त्यावेळी मला ती अतिशयोक्ती वाटली. कारण, आदितीने कुठल्याही स्पर्धेत भाग घेतलेला नव्हता. परंतु प्रशिक्षकांनी आदितीबद्दल व्यक्त केलेल्या विश्वासाने मी भारावून गेलो होतो. त्यानंतर मी आर्चरीचे सर्व साहित्य आदितीला उपलब्ध करून दिले. 2018 मध्ये तीला आर्चरीच्या कंपाऊंड या प्रकारात शिफ्ट करण्यात आले. त्यासाठी अडीच-तीन लाखांचा धनुष्य खरेदी केला. या प्रकारातील तिने बारकावे आत्मसात केले. या खेळातील तिचे आयडॉल वेण्णम ज्योती सुरेखा, अभिषेक वर्मा यांचे व्हिडिओ पाहून ती सराव करत होती. लॉकडाऊनमध्ये तर आदिती घराजवळच्या बोळात तिरंदाजीचा सराव करत होती, असेही त्यांनी सांगितले.
आंध्र प्रदेशमध्ये पदकाचा श्रीगणेशा : आंध्र प्रदेशमध्ये 2018 साली झालेल्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक सिल्व्हर मेडल पटकावत आदितीने पदकाचा श्रीगणेशा केला. 2019 मध्ये उत्तर प्रदेशमधील स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावले. तेव्हापासून आदितीने पदकांची लयलूट करण्यास सुरूवात केली. जून महिन्यात लिमेरिक (आयर्लंड) येथे झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत विजेतेपद मिळवले. एक महिन्यापूर्वीच तिने वर्ल्ड कप तिरंदाजी स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत 711 गुणांची कमाई करत 18 वर्षांखालील गटात जागतिक विक्रम प्रस्थापित केला होता. बर्लिनमध्ये तर 17 व्या वर्षी जागितक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक पटकावणारी पहिली तिरंदाज ठरली.
आदितीला ऑलिम्पिकचे वेध : बर्लिनची वर्ल्ड कप आर्चरी स्पर्धा आदितीसाठी महत्वपूर्ण ठरली आहे. मेक्सिकोची दोन वेळची वर्ल्ड चॅम्पियन एंट्रिया बेसिरोवर मात करून जगातील सर्वात कमी वयाची वर्ल्ड चॅम्पियन बनली. या यशामुळे भारतासह जगभरात आदितीच्या नावाचा डंका झाला. ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे तिचे स्वप्न आहे. त्या दृष्टीने ती पुढील वाटचाल करत आहे.
हेही वाचा -