सातारा- भाच्याचे लग्न म्हणजे मामा पाहिजेच अशी परंपरा आहे. या परंपरेला फाटा देत सातारचे अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी भाच्याचे लग्न आणि आपले कर्तव्य यामध्ये कर्तव्याला प्राधान्य देत चक्क इंटरनेटवरून या लग्नसोहळ्याला उपस्थिती लावली.
धीरज पाटील यांच्या भाच्याचे लग्न सातारा शेजारीच असणाऱ्या सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात होते. मनात आणले असते तर त्यांना तेथे पोहचणे शक्य देखील होते. परंतु कोरोनाच्या या संकटावेळी आपले कर्तव्य आणि लोकांची सेवा याला महत्व देत त्यांनी हा सोहळा इंटरनेट वरून अनुभवला.
सोशल डिस्टनसिंग चे सर्व नियम पाळत अगदी साधेपणाने तोंडाला मास्क लावून मोजक्याच लोकांच्या साक्षीने आणि इंटरनेट च्या मदतीने मामाच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला. आपल्या अधिकाराचा वापर न करता जनतेच्या सेवेला प्राधान्य देणाऱ्या सातारच्या अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या यांच्या कृतीचे जनतेमधून कोतुक होत आहे.