कराड (सातारा) - साडेसात लाखांच्या घरफोडीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला कराड शहर पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील महंमदवाडी येथून ताब्यात घेतले. असद फिरोज जमादार (रा. भाजी मंडई, गुरूवार पेठ, कराड), असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ७ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
बनवडी (ता. कराड) येथे २७ डिसेंबर रोजी घरफोडी झाली होती. अडीच लाखाची रोकड आणि १० तोळ्याचे दागिने, असा एकूण साडे सात लाखांचा ऐवज चोरट्याने लंपास केला होता. या गुन्ह्यातील संशयित पुणे जिल्ह्यातील महमंदवाडी गावात लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
७ लाख ३९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त-
त्यानुसार कराड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे, अमित बाबर, कॉन्स्टेबल धीरज कोरडे, प्रफुल्ल गाडे, समीर वाघमळे, पोलीस नाईक सचिन साळुंखे यांनी पुणे जिल्ह्यातील महंमदवाडी गावातून संशयितास ताब्यात घेतले. संशयिताकडून सोन्याचे दागिने, एक स्पोर्ट्स बाइक, अॅपल कंपनीचा महागडा मोबाईल आणि रोख रक्कम मिळून ७ लाख ३९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हेही वाचा- अल्पवयीन 'फेसबुक' मैत्रिणीवर अत्याचाराचा प्रयत्न, तरुणासह मदत करणारा अटकेत