सातारा - खाच-खळग्यांचा रस्ता, उखडलेली खडी आणि उडणारी धूळ यामुळे केवळ वाहनधारकच नव्हे तर कोडोली ग्रामस्थ देखील हैराण झाले आहेत. धुळीमुळे पिकांचेही नुकसान होत आहे. रस्त्यावरून उडणारे धुलीकन नाकावाटे दिर्घकाळ फुफ्फुसात गेल्याने स्थानिक नागरिकांना श्वसनाचे विकार जडण्याचा धोका आहे. हा त्रास किती दिवस सहन करायचा असा सवाल येथील नागरिक उपस्थित करत आहेत.
खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण
पोलादपूर- विटा या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या दीड वर्षांपासून सुरू आहे. देगावफाटा ते कोडोली कॅनॉल या दरम्यान कोडोली गावठाणातून जाणा-या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. रस्त्याला मोठे मोठे खड्डे पडले असून, रस्ता नावालाही शिल्लक राहिलेला नाही. उखडलेल्या खडीमुळे वाहने घसरून अपघातांना निमंत्रण मिळत आहे.
व्यावसायिक बेजार
रहदारीमुळे रस्त्यावरून उडणारी धुळ कोडोली ग्रामस्थांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रस्त्यावरून उडणारी धूळ लगतच्या दुकानांमध्ये बसत असून, तेथील व्यवसायावर मोठा परिणाम झाला असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही परिस्थिती कायम आहे. रस्त्याचे काम सुरू झाले आहे. मात्र कित्येक दिवसानंतरही रस्त्याचे काम अर्धवटच असल्याने ग्रामस्थांचे नुकसान होत आहे.
श्वसनाच्या विकारांचा धोका
हा हमरस्ता कोडोली गावठाणातून जात असल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुंची घरं व तेथील रहिवाशांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. उडणाऱ्या धुळीमुळे श्वसनाचे विकार होण्याचा धोका वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ही धूळ रस्त्यालगतच्या पिकांचे मोठे नुकसान करत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने अजंठा हॉटेल ते कोडोलीतील कॅनॉल पर्यंतच्या मार्गाचे डांबरीकरण व रुंदीकरण तातडीने करून घ्यावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
आंदोलनाचा इशारा
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व कोडोलीचे रहिवासी रवी साळुंखे यांनीही या महामार्गाच्या कामाबद्दल व रस्त्याच्या दुरवस्थेबाबत 'ईटीव्ही भारत'शी बोलताना नाराजी व्यक्त केली. हा रस्ता आज ना उद्या होईल, या भाबड्या आशेवर ग्रामस्थांनी किती दिवस हाल सहन करायचे, असा सवाल रवी साळुंखे यांनी उपस्थित केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्याचे काम हाती घ्यावे, अन्यथा आंदोलन करू असा इशारा कोडोली ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.