कराड (सातारा) - मगरीच्या वावरामुळे कृष्णा नदीकाठावरील मालखेड, वाठार, रेठरे खुर्द, रेठरे बुद्रुक तसेच वाळवा तालुक्यातील कासेगाव येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने मगरीला पकडून सुरक्षितस्थळी सोडण्याची मागणी कृष्णा नदीकाठच्या ग्रामस्थांनी केली आहे.
भीतीचे वातावरण
कराड तालुक्यातील मालखेड येथे कृष्णा नदीकाठावर महाकाय मगरीचे नागरिकांना दर्शन झाले. मगरीच्या वावरामुळे कृष्णा नदीकाठावरील मालखेड, वाठार, रेठरे खुर्द, रेठरे बुद्रुक तसेच वाळवा तालुक्यातील कासेगाव येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने मगरीला पकडून सुरक्षितस्थळी सोडण्याची मागणी कृष्णा नदीकाठच्या ग्रामस्थांनी केली आहे.
मोबाइलवर चित्रीकरण
जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे कृष्णा नदीला महापूर आला होता. महापुरामुळे मातीचा गाळ, झाडेझुडपे आणि कचरा मोठ्या प्रमाणात नदीकाठावर साचला आहे. सध्या पूर ओसरला असून नागरिक नदीकाठच्या शेतात जाऊ लागले आहेत. मालखेड (ता. कराड) गावात कृष्णा नदीकाठी असलेल्या उपसा सिंचन योजनेच्या विहिरीलगत नागरिकांना महाकाय मगर दिसली. त्यानंतर काही तरूणांनी मगरीचे मोबाइलवर चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर टाकले. त्यानंतर मगर पाहण्यासाठी कृष्णाकाठी मोठी गर्दी झाली.
वन विभागाला दिली माहिती
नागरिकांनी वन विभागाशी संपर्क साधून मगरीची माहिती दिली. मात्र, बघ्यांची गर्दी आणि गोंधळामुळे मगर पुन्हा नदीपात्रात उतरली. ग्रामीण भागातील महिला, नागरीक नदीच्या पाणवठ्यावर कपडे धुण्यासाठी, अंघोळीसाठी जातात. तसेच नदीकाठच्या शेतातही लोकांचा वावर असतो. नदीपात्रातून मगर काठावर तसेच शेतात येऊ लागल्यामुळे नागरिक धास्तावले आहेत. वन विभागाने मगरीला पकडून सुरक्षितस्थळी सोडावे, अशी मागणी कृष्णा नदीकाठच्या गावातील नागरिकांनी केली आहे.