सातारा - घराशेजारी सायकल खेळताना समोरून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीची जोरदार धडक बसून बालकाचा मृत्यू झाला. मयुर महेश नामदे (वय, ६ ) असे मृत बालकाचे नाव आहे. या अपघातात दुचाकीस्वारही जखमी असून त्याच्यावरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
म्हसवड येथील नामदे वस्ती येथे महेश गुलाब नामदे यांचे कुटुंब वास्तव्यास आहेत. मंगळवारी सायंकाळच्या वेळी मयुर घराशेजारील परिसरात सायकल खेळत होता. सायकल फिरवताना तो शेजारील डांबरी रस्त्यावर आला. त्याचवेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या महेश नंदकुमार होळ यांच्या दुचाकीने मयुरला जोरदार धडक दिली. या अपघातात मयुरच्या डोक्याला अंतर्गत मोठी इजा झाल्याने त्याचा जागेवरच मृत्यु झाला.
हेही वाचा - पावसाच्या विश्रांतीनंतर सातारा जिल्ह्यातील अनेक भागात धुक्याची दुलई
दरम्यान, मयुरच्या अपघाताची बातमी समजताच परिसरातील अनेकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. सदर अपघाताची माहिती मयुरचे चुलते सुरेश नामदे यांनी म्हसवड पोलिसांना दिली. पोलीसांनी मयुरचे शव प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. मात्र, याठिकाणी शवविच्छेदन करणारी व्यक्तीच उपलब्ध नसल्याने रात्री उशीरा मयुरच्या मृत्युदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर शोकाकुल वातावरणात मयुरवर अंत्यसंस्कार करण्यात आले.