सातारा - कोयना धरणाचे गेल्या सहा दिवसांपासून उघडण्यात आलेले सहा वक्र दरवाजे आज (गुरुवार) बंद करण्यात आले. त्यामुळे कोयना धरणातून केवळ पायथा विजगृह सुरू करण्यात आले आहे. मात्र, गुरुवारी दुपारनंतर पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला. त्यामुळे कोयना धरणात येणारी पाण्याची आवक वेगाने सुरू झाली असून धरणात ९३ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. दरम्यान पावसाचा जोर असाच वाढत गेल्यास धरणाचे सहा वक्र दरवाजे पुन्हा उघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोयना पाणलोट क्षेत्रात कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे १४ ऑगस्टपासून उघडण्यात आले होते. प्रथम पावणेदोन फूट, नंतर चार, सहा, सात आणि शेवटी दहा फुटांपर्यंत दरवाजे उघडून कोयना धरणातून सुमारे ५६ हजार क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू होता. त्यामुळे पाटण कराड आणि सांगली परिसरात पुराचा धोका निर्माण झाला होता.
हेही वाचा - सीमा तपासणी नाक्यावर रुग्णवाहिका अडवून ठेवल्याने उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू
गेल्या चोवीस तासांपासून पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने गुरुवारी सकाळी कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे बंद करून धरणाच्या पायथा विजगृहातून केवळ २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग चालू ठेवण्याचा निर्णय कोयना सिंचन विभागाने घेतला आहे. त्यामुळे पाटणसह कराड सांगली परिसरातील जनतेमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान गुरुवारी दुपारनंतर कोयना पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला असल्याने धरणाच्या पाणीसाठयात येणारी आवकही वाढली आहे. गुरुवारी सायंकाळ पर्यंत ती आवक प्रतिसेकंद ६१ हजार ३६१ इतकी झाली आहे. त्यामुळे कोयना धरणातील सध्या ९२.४९ टीएमसी पाणीसाठा असून धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजून १२ टीएमसी इतक्या पाण्याची गरज आहे. मात्र, पावसाचा जोर असाच सुरू राहिल्यास धरणाचे दरवाजे पुन्हा उघडण्याची शक्यता वाढली आहे.
कोयना पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासांपासून प्रतिसेकंद ६१ हजार ३६१ क्यूसेक पाण्याची आवक सुरू असून गुरुवारी सकाळी ८ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोयनानगर येथे २४ (३७३८), नवजा येथे ५८(४२७३) मिलिमीटर आणि महाबळेश्वर येथे ३३ (४१७०) मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद होऊन धरणातील पाणीसाठा ९२.४९ टीएमसी इतका झाला आहे.
पाण्याखाली गेलेले पूल खुले...
शुक्रवार दिनांक १४ ऑगस्टपासून कोयना नदीच्या पाण्याखाली गेलेले पाटण तालुक्यातील मेंढघर, संगमनगर जुना धक्का पूल, निसरे फरशी हे दोन दिवसांपूर्वी तर मुळगाव आणि नेरळे हे दोन मोठे पूल ही पुराचे पाणी ओसरल्यामुळे खुले झाले आणि या मार्गावरील वाहतूक ही गुरुवार पासून सुरळीत झाली.