सातारा - शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेला जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ५१ जुगारींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 10 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या नेतृत्वात ही धडक मोहीम राबविण्यात आली.
चौथ्या मजल्यावर रंगत होते डाव-
साताऱ्यातील यशवंत हॉस्पिटलजवळच्या वरदविनायक अपार्टमेंटमधील चौथ्या मजल्यावर जुगार अड्डा सुरू होता. किरण बबनराव भोसले (रा. करंजे पेठ) यांच्या मालकीचा या मजल्यावर दिलीप नामदेव इरळे (रा. बसप्पापेठ, राधिकारोड, सातारा) हा बेकायदेशीरपणे जुगारअड्डा चालवत होता. याबाबत अक्षीक्षक आंचल दलाल यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार तेथे छापा टाकण्यात आला. त्यावेळी त्या ठिकाणी ५१ जुगारी जुगार खेळताना आढळून आले.
तीन पत्ता जुगार खेळायचे-
सुमारे पन्नासहून अधिक लोक पत्त्यांचा तीन पानी जुगार खेळताना आढळले. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात ऐवज होता. या कारवाईत वाचक पोलीस उपनिरीक्षक भीमराव यादव, पोलीस हवालदार मुल्ला, पोलीस मुख्यालयातील पोलीस नाईक प्रवीण पोळ, शंकर गायकवाड, तेजस भोसले, उज्वल कदम, प्रसाद शिंदे, राजकुमार घोरपडे, अविराज वारागडे, सुशांत गवळी आदी सहभागी झाले होते.