सातारा - त्यांनी पार्टीचा खास बेत आखला. २ शिकारी कुत्र्यांच्या सहाय्याने डाव यशस्वीही केला. १८ ते २० किलोचे सावज हाती लागले. सकाळी वाटे झाले अन् दारात वन अधिकारी पोहचले. वन्यप्राण्याच्या मांसासह धावडशीच्या 5 युवकांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
आकाश अरुण पवार (वय 20), शशिकांत प्रकाश पवार (वय 24), प्रकाश शरद अनपट (वय 19), मंगेश नारायण पवार (वय 29, सर्व (रा.धावडशी, ता. जि. सातारा) व सोमनाथ बाळासाहेब घारगे (वय 29, रा.आकले ता. जि. सातारा) अशी संशयितांची नावे आहेत. वनाधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली आहे. रानडुक्कर मारुन त्याचे मांस शिजवण्यासाठी घरी नेल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
ही कारवाई कोल्हापूरचे विभागीय वनअधिकारी (दक्षता) सागर गवते यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे, वनपाल गजानन भोसले, वनरक्षक दिपक गायकवाड, विजय भोसले, पोलीस हवालदार राजेश वीरकर, सुहास पवार, दिनेश नेहरकर यांनी यशस्वी केली.
हेही वाचा - टोलनाका आंदोलनप्रकरणी शिवेंद्रराजेंसह 80 जणांवर गुन्हा
शिकारी कुत्र्यांचा वापर -
पाचही संशयित साताऱ्यात प्लंबिंगची कामे करतात. काल त्यांनी शिकारीचा बेत आखला अन् लगोलग तो अंमलातही आणला. काल रात्री दोन शिकारी कुत्र्यांसह धावडशीजवळच्या डोंगरात गेले. कुत्र्यांनी त्यांचे काम बरोबर केले. साधारण १७ ते २० किलोचे रानडुक्कर त्यांच्या हाती लागले. सकाळी मांस बारीक करुन वाटेही ज्याचे त्याला देण्यात आले. तोपर्यंत या शिकारीची वार्ता साताऱ्याच्या वनविभागात जाऊन थडकली. अधिकाऱ्यांची मोटार धावडशीच्या दिशेने धावली. इकडे वाटे घरात पोहचताहेत न पोहचतायत तोच वन अधिकारी दारात येऊन उभे राहिले. अन् ठरलेला खाशा बेत शिजता शिजता राहिला!
दोन घरात आढळले मांस -
धावडशीत दोन घरांच्या झडतीत दोन्ही घरांतून रानडुक्कराचे तुकडे करुन ठेवलेले कच्चे मासं हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी वनविभागाने वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 अन्वये गुन्हा नोंद केला आहे. गुन्हयात वापरण्यात आलेली मोटर सायकल (क्रमांक एम.एच.1/ए.यू.8922) व इतर साहित्य जप्त करण्यात आले.
हेही वाचा - विकी लाखे खून प्रकरण: संशयितांना पकडणार्या टीमचे अप्पर पोलीस अधीक्षकांकडून कौतुक
दंड व सक्तमजूरीची तरतूद -
कायद्यातील तरतूदीनुसार गुन्हा सिद्ध झाल्यास या पाचही जणांना प्रत्येकी २५ हजार रुपये दंड व दोन वर्षांपर्यंत सक्तमजुरीची शिक्षा होऊ शकते. त्यांनी केला पार्टीचा बेत, पण आता तोच त्यांना भारीच महागात पडला आहे!
"वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 39 नुसार वन्यप्राणी ही राष्ट्रीय संपत्ती असून तिचे रक्षण करणे हे सर्वांचे मूलभूत कर्तव्य आहे. मात्र, मांसाच्या लोभापायी लोकांकडून रानडुक्कर, ससे, भेकर, साळींदर, सांबर ईत्यादी वन्यप्राण्यांची शिकार करण्याची अपप्रवृत्ती वाढत आहेत. शिकारीबाबत कोणतीही माहिती असल्यास वनविभागाचे स्थानिक कार्यालय अथवा 1926 या वनविभागाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा"