सातारा - जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या अपेक्षांना आमदार जयकुमार गोरे व शिवसेना नेते शेखर गोरे यांनी धक्का दिला आहे. गोरे बंधूनी स्वतंत्र पॅनेल टाकण्याचे स्पष्ट संकेत दिल्याने जिल्हा बँकेत तिरंगी लढत होण्याची शक्यता बळावली आहे.
18 जागांसाठी 450 अर्ज -
राष्ट्रवादीच्या दिग्गजांनी तर भाजपचे खासदार उदयनराजे भोसले, रणजितसिंह नाईक निंबाळकर व माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी शक्ती प्रदर्शनाद्वारे अर्ज भरले. जिल्हा बँकेच्या तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर राजकीय घडामोडींना वेग आला होता. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 18 जागांसाठी साधारण 450 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.
राष्ट्रवादी विरुद्ध भाजप-शिवसेना -
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वसमावेश पॅनेलच्याविरोधात आमदार जयकुमार गोरे आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी चार जागा वगळता उर्वरित सर्व मतदारसंघातून उमेदवार दिले आहेत. तसेच शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांनीही बहुतांशी मतदारसंघात उमेदवार दिल्याने त्यांचेही स्वतंत्र पॅनेल होण्याची शक्यता असल्याने राष्ट्रवादीच्या विरोधात गोरे बंधूंची दोन पॅनेल उभी राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबतचे चित्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा - संचालक पदावरून शिवेंद्रसिंहराजे यांची उदयनराजे यांच्यावर टीका, म्हणाले..
राष्ट्रवादीचे तिघे बिनविरोध -
राष्ट्रवादीच्या सर्वसमावेशक पॅनेलमधील तिन उमेदवार अर्ज दाखल करण्याच्या दिवशीच बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये खरेदी विक्री संघ मतदारसंघातून आमदार मकरंद पाटील, महाबळेश्वर सोसायटी मतदारसंघातून राजेंद्र राजपुरे तसेच कृषी उत्पन्न प्रक्रिया संस्था मतदारसंघातून शिवरुपराजे खर्डेकर यांचा समावेश आहे.