सातारा : धान्यातील किटक नाशक पावडरच्या उग्र वासाने शरीरात अंतर्गत रक्तस्त्राव होऊन बहिण-भावाचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना कराड तालुक्यातील मुंढे गावात घडली आहे. श्लोक अरविंद माळी (वय 3 वर्षे) आणि तनिष्का अरविंद माळी (वय 7), अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. त्यांना उलट्या आणि खोकल्याचा त्रास झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शरीरात अंतर्गत रक्तस्त्राव आणि शरीरातील पाणी कमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात म्हटले आहे. कराड शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
उलट्यांचा त्रास झाल्याने रूग्णालयात दाखल : श्लोक याला उलट्याचा त्रास होऊ लागल्याने सोमवारी (दि 13) त्याला कराडमधील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना श्लोकचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याची बहिण तनिष्काला उलट्या व खोकल्याचा त्रास होऊ लागला. नाशक पावडरचा वासाचा त्रास तिलाही झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला. चिमुकल्या बहिण-भावाच्या मृत्युमुळे मुंढे कुटूंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
शरीरात अंतर्गत रक्तस्त्राव : तीन वर्षाच्या श्लोकच्या मृतदेहाचे शवाविच्छेदन केल्यानंतर शरीरात झालेल्या अंतर्गत अतिरक्तस्त्रावामुळे तसेच शरीरातील पाणी कमी झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, तनिष्काचे मंगळवारी रात्री शवविच्छेदन करण्यात आले. मात्र, शवविच्छेदनाचा अहवाल उशीरापर्यंत मिळू शकला नाही. त्यामुळे तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. या घटनेची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव तपास करत आहेत.
किटक नाशक पावडरचा उग्र वास : मुंढे (ता. कराड) येथील अरविंद माळी यांच्या घरात धान्य साठवून ठेवत त्यामध्ये टाकलेल्या किटक नाशक पावडरचा घरात उग्र वास येत असल्याची माहिती कुटुंबीय आणि नातेवाईकांनी पोलिसांना दिली आहे. त्यानुसार पोलीस माहितीची सत्यता पडताळून तपास करत आहेत. एकाच कुटुंबातील सख्ख्या बहिण-भावाचा मृत्यू झाल्याने कराड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.