कराड (सातारा) - रशियात वैद्यकिय शिक्षण घेणारे पश्चिम महाराष्ट्रातील 27 विद्यार्थी काल (मंगळवारी) सकाळी मायदेशी परतले. खासदार श्रीनिवास पाटील यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी संपर्क साधून ‘वंदे भारत मिशन’अंतर्गत विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्याची विनंती केली होती.
रशिया येथील अलताई स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीत वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी लॉकडाऊनमुळे तीन महिन्यापासून रशियातच अडकून पडले होते. कराड येथील रणजित शिंदे यांच्या मुलीचाही त्यात समावेश होता. सर्व विद्यार्थ्यांना मायदेशी परत आण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती रणजित शिंदे यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांना केली होती.
पाटील यांनी 27 विद्यार्थ्यांची यादीसह परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना पत्र पाठवले होते. वंदे भारत मिशन अंतर्गत विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्याची विनंती केली होती. त्यास परराष्ट्र मंत्रालयासह रशियातील भारतीय दूतावासाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
मास्को ते मुंबई विमानाने मंगळवारी सकाळी 27 विद्यार्थ्यांचे मुंबईत आगमन झाले. खासदार श्रीनिवास पाटील यांना खा. सुप्रिया सुळे यांचेही सहकार्य मिळाले. आई-वडिलांना भेटण्याची ओढ लागली होती. त्यामुळे मायदेशी परतल्याचा आनंद झाला आहे. खा. श्रीनिवास पाटील यांनी केलेल्या प्रयत्नाने आम्ही सर्वजण सुखरूप पोहचलो आहोत. सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद, असे भारतात परतेलेली विद्यार्थीनी मृणाली शिंदे म्हणाली.