सातारा - जुलै-ऑगस्ट आणि नंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात पाटण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत पिकांचे नुकसान आणि घरांची पडझड झालेल्या बाधितांना 3 कोटी 77 लाख 56 हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर झाली असून ती मदत पाटण तहसील कार्यालयाकडे वर्ग करण्यात आली असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाई यांनी दिली आहे.
यंदाच्या अतिवृष्टीत पाटण तालुक्यात शेती आणि घरांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना तातडीने अर्थिक मदत मंजूर करण्याची मागणी पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली होती. महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाने पीके आणि घरांच्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाला प्रस्ताव सादर केला होता. 12 हजार 332 शेतकर्यांच्या एकूण 2 हजार 999.75 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. तसेच 2 हजार 500 घरांची पडझड झाली होती. या बाधितांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी आमदार देसाईंनी केली होती. पीकांचे नुकसान आणि घरांची पडझड झालेल्या बाधितांना मंजूर झालेली मदत पाटण तहसील कार्यालयाकडे वर्ग सुध्दा करण्यात आली असल्याचे आमदार देसाईंनी सांगितले. शासनाकडून आलेली नुकसान भरपाईची रक्कम तातडीने बाधितांना वितरित करावी, अशी सूचना देखील त्यांनी पाटणच्या तहसीलदारांना केली आहे.