कराड/सातारा- कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणाचा पायथा वीजगगृह आज सकाळी 11 वाजता कार्यान्वित केला जाणार आहे. वीजनिर्मिती करून प्रति सेकंद 2100 क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडले जाणार असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे. कोयना धरणातून विसर्ग सुरू होणार असल्याने कोयना-कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असून, नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
नदीकाठच्या लोकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन
कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर, महाबळेश्वर आणि नवजा परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. कोयना धरणात प्रति सेकंद सरासरी 41 हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे आज सकाळी 11 वाजता कोयना धरणाचा पायथा वीजगृह कार्यान्वित केला जाणार आहे. दोन जनित्रांद्वारे वीजनिर्मिती करून प्रति सेकंद 2100 क्युसेक पाणी कोयना नदीत सोडले जाणार आहे. दोन दिवसातील दमदार पावसामुळे कोयना आणि कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. कोयना धरणातून पाणी सोडले जाणार असल्याने नदीकाठच्या लोकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन महसूल प्रशासनाने केले आहे.
कोयना धरणाच्या पाथवा वीजगृहातून सोडण्यात येणार पाणी
कोयना नदीवर असणार्या कोल्हापूर पध्दतीच्या बंधार्यांच्या फळ्या काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे 6 जूनपासून कोयना धरणातून पाणी सोडण्याचे थांबविण्यात आले होते. पूर्वेकडील सिंचनासाठी कोयना धरणातील आरक्षित पाणी पूरकाळात विनाकारण सोडावे लागू नये, म्हणून आजपासून कोयना धरणाच्या पाथवा वीजगृहातून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती कोयना धरणाचे कार्यकारी अभियंता नितीश पोतदार यांनी दिली आहे.
हेही वाचा - सांगली : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत एका दिवसात 14 फुटांनी वाढ