सातारा - पुण्याच्या येरवडा कारागृहातून सातारा जिल्हा कारागृहात हलवलेले 2 कैदी कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आल्याने सातारा जिल्हा कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे. दोन्ही बाधितांना क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुण्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून येरवडा कारागृहातील काही कैदी राज्यात अन्यत्र हलविण्यात आले. सरकारी सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आठ दिवसांपूर्वी या दोन कैद्यांना येथील जिल्हा कारागृहात आणण्यात आले होते. बरॅक क्रमांक 3 व 4 मध्ये त्यांना ठेवले होते.
प्रवासाची ज्यांची हिस्ट्री आहे, अशांचे स्वॅब आरोग्य यंत्रणा घेत असते. त्यानुसार सातारा जिल्हा कारागृहातील 25 कैद्यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यात हे दोघे कोरोना पाॅझिटीव्ह निघाले. दोघेही कच्चे कैदी असून त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, फलटणचे उपजिल्हा रुग्णालय व कोरेगावचे ग्रामीण रुग्णालयात या ठिकाणी प्रत्येकी एका रुग्णाचा कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे. फलटणचा रुग्ण हा बाधित रुग्णाचा निकट सहवासित आहे. तर कोरेगावचा रुग्ण कराड येथून प्रवास करुन आलेला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.