सातारा : या राड्यातील ८ जणांना अटक करण्यात आली आहे, तर अन्य संशयित फरारी आहेत. मिरेवाडीतील दोन गटात रस्ता आणि घराच्या बांधकामावरून वाद सुरू झाला. वादाचे रूपांतर जोरदार राड्यात झाले. लोखंडी रॉड, लाठ्याकाठ्यांनी मारामारी सुरू झाली. या वादावेळी एका गटाने जनावरांच्या शेडसह तेथील वाहने पेटवून दिली. या तुंबळ हाणामारीत दोन्ही गटातील १० जण जखमी झाले. एकूण 42 जणांविरोधात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
जनावरांचे शेड, वाहने पेटवली : सुनील धायगुडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, रस्त्याच्या जागेवरून नामदेव धुमाळ व विनोद रूपनवर यांच्यात वाद सुरू असताना संतोष शेळके, नीलेश शेळके, अक्षय रूपनवर याच्यासह २२ जणांनी बेकायदेशीर जमाव जमवला. नामदेव धुमाळ, आशा धुमाळ, सायली धुमाळ, विराज धुमाळ, तुषार धुमाळ, चालक जय बहादूर यांना लोखंडी रॉड, काठ्या आणि लाथाबुक्यांनी मारहाण केली. राहते घर, पिकअप गाडी, दुचाकी, दोन ट्रॅक्टर, धान्य, जनावरांचे शेड पेटवून दिले.
घराचे बांधकाम पाडले : विनोद रूपनवर यांनी तक्रारीत म्हटले आहे की, माझ्या घराचे बांधकाम सुरू असताना गावातील २० जण जमाव जमवून हातात काठ्या घेऊन आले. तुम्ही येथे घराचे बांधकाम करायचे नाही, असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी करून नवीन घराचे बांधकाम पाडून नुकसान केले. त्याचा जाब विचारला असता माझ्यासह पत्नी, भावजय, आईला काठीने तसेच हाताने मारहाण केली. त्यांच्या तक्रारीवरून २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
४२ जणांवर गुन्हा, ८ जणांना अटक : मिरेवाडीतील या राड्याप्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूच्या ४२ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील ८ जणांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. उर्वरीत संशयित फरारी झाले आहेत. लोणंदचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर हे पुढील तपास करत आहेत. या राड्यामुळे मिरेवाडी गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
हेही वाचा : Maharashtra Budget 2023 : शिंदे फडणवीस सरकार सादर करणार अर्थसंकल्प