सातारा - सातारा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने पोलिसांनी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी वाहन जप्तीचा धडाका लावला आहे. मंगळवारपर्यंत 1 हजार 401 वाहने जप्त करण्यात आली. अरुंद गल्ल्या आणि टेरेसवर गर्दी जमू नये यासाठी ड्रोन कॅमेऱयांचीही मदत घेतली जात आहे.
जमावबंदीचे आदेश मोडून विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्या वाहनचालकांना वचक बसण्यासाठी सातारा पोलिसांनी जिल्ह्यात वाहन जप्तीच्या कारवाया सुरू केल्या. सातारा जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात 61 चार चाकी वाहनांवर तर 1 हजार 340 दुचाकींवर कारवाई करण्यात आली.
गल्लीबोळांत, आड बाजूला युवकांची टोळकी बसत असल्याच्या काही तक्रारी पोलिसांना मिळत आहे. इमारतींच्या स्लॅबवर लोक जमा होऊन जमावबंदीचा भंग करत आहेत. तसेच स्वत: बरोबर इतरांचाही जीव धोक्यात घालत आहेत. अशांवर वचक ठेवण्यासाठी पोलिसांनी ड्रोनचा वापर सुरू केला आहे.
ओळखपत्राचा गैरवापर-
सातारा महानगरपालिका कर्मचाऱ्याच्या ओळखपत्राचा गैरवापर करून संचारबंदीचा भंग करणाऱया दोघांवर कारवाई करण्यात आली. वरद चक्के (वय-२३) आणि अमेय जगताप (वय-२२, दोघेही रा. सोमवार पेठ) या दोन युवकांवर शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.