सातारा : विवस्त्र अवस्थेत ( Running naked ) महामार्गावरून धावताना एका तरूणाचा ट्रकखाली सापडून मृत्यू ( died after being found under truck ) झाला आहे. प्रवीण संपत भोसले वय ३०, राहणार खर्शी, तालुका जावळी असे मृत तरूणाचे नाव आहे. साताऱ्यातील वाढे फाटा परिसरात झालेल्या या अपघाताची नोंद शाहुपुरी पोलीस ठाण्यात झाली असून पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.
विवस्त्र अवस्थेत महामार्ग ओलांडताना अपघात : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीण भोसले हा रात्री दुचाकीवरून वाढे फाट्याकडे गेला होता. त्यावेळी त्याच्यासोबत लुटमार झाली की अन्य कोणता प्रकार घडला, हे अद्याप समोर आले नाही. मात्र, तो विवस्त्र अवस्थेत महामार्ग ओलांडून धावत असताना कोल्हापूरहून पुण्याकड़े निघालेल्या ट्रकखाली सापडून त्याचा मृत्यू झाला आहे.
ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात : या अपघाताची माहिती मिळताच शाहूपुरी पोलीस आणि सातारा तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन ट्रकचालकाला ताब्यात घेतले. परंतु प्रवीण भोसले हा धावत येत असताना ट्रकखाली सापडल्याचा जबाब ट्रक चालकाने दिला आहे. तो विवस्त्र कसा झाला, त्याची कपडे कुठे आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शाहुपुरी पोलीस या अपघाताचा कसून तपास करीत आहेत.