सांगली - येत्या शिवजयंतीदिनानिमित्त शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याची विश्वविक्रमी रांगोळी साकारण्यात येत आहे. ही महारांगोळी काढण्यासाठी तब्बल १०० कला शिक्षक अहोरात्र झटत असून एकाच वेळी ९ वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये या महारांगोळीची नोंद होणार आहे. येत्या १०० तासात ही अद्भुत कलाकृती साकारण्यात येणार आहे.
१९ फेब्रुवारीला एकाच वेळी ९ वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये या महारांगोळीची नोंद होणार आहे
जवळपास ३० टन रांगोळी आणि विविध रंगांचा वापर करून ही रांगोळी १०० तासात पूर्ण केली जाणार आहे. विशेष म्हणजे लोकवर्गणीतून हा उपक्रम राबवला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व दाखवणार शिवराज्याभिषेक सोहळा जगासमोर एका वेगळ्या पद्धतीने आणण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. १९ फेब्रुवारीला सायंकाळी ही भव्य दिव्य महाविश्वक्रमी रांगोळी पूर्ण होणार असून २५ फेब्रुवारीपर्यंत खुली राहणार आहे.