सांगली - पूरग्रस्त महिलांच्या बचत गटांची कर्जवसुली थांबवावी, या मागणीसाठी महिलांनी सांगलीमध्ये मायक्रोफायनान्स कंपनीच्या कार्यालयावर हल्लाबोल केला आहे. यावेळी संतप्त महिलांनी मायक्रो फायनान्स कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकले.
सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त महिलांनी मोठ्या प्रमाणात बचत गटाची कर्ज घेतली आहेत. महापुरानंतर अनेक महिलांना परिस्थितीमुळे कर्ज फेडणे अशक्य बनले आहे. अशा परिस्थितीमध्ये मायक्रोफायनान्स कंपनीकडून मात्र सक्तीने वसुली सुरू आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या पूरग्रस्त महिलांनी आज(गुरुवार) छत्रपती शासन या संघटनेच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढला होता. मात्र, समाधान होऊ न शकल्याने संतप्त पूरग्रस्त महिलांनी शहरातल्या मायक्रोफायनान्स कंपनीच्या कार्यालयाकडे आपला मोर्चा वळवला. तसेच कार्यालयावर हल्लाबोल करत या ठिकाणी असणाऱ्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतर संतप्त पूरग्रस्त महिलांनी मायक्रो फायनान्स कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकले. मायक्रोफायनान्स कंपनीकडून सुरू असलेली सक्तीची वसुली तातडीने थांबवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
हेही वाचा - पूरग्रस्त महिलांचा बचत गटांच्या कर्जमाफीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
हेही वाचा - सांगलीमध्ये कोरोना सेंटर उभारण्याला स्थानिकांचा कडाडून विरोध