जत (सांगली) - तालुक्यातील वायफळ येथील शालन दादासो सावंत (वय 32 वर्षे ) या विवाहित महिलेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. 28 जुलै) रात्री च्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, वायफळ गावातील सावंत वस्ती येथील रहिवासी शालन सावंत यांच्या नातेवाईकांनी शेतामध्ये मक्याची लागवड केली होती. भटकी जनावरे नुकसान करत असल्याने मक्याच्या पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून कंपाऊंड मारून त्या कंपाऊंडच्या तारेला विजेची तार जोडलेली होती. दरम्यान, कामानिमित्त शालन सावंत शेतामध्ये गेल्या असता त्यांचा हात वीजेचा प्रवाह असलेल्या कंपाऊंडच्या तारेवर पडला.
त्यामुळे वीजेचा धक्का बसला व त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, दादासो सावंत हे पत्नी अद्यापही घरी आली नसल्याने शेतात धाव घेतली. त्यावेळी शालन या पडलेल्या अवस्थेत त्यांना दिसल्या त्यांना हात लावताच दादासो यांनाही विजेचा धक्का बसला मात्र ते सुदैवाने ते बचावले. त्यांच्या पश्चात दोन मुली असून या घटनेने परिसर हळहळ व्यक्त होत आहे. अधिक तपास जत पोलीस करत आहेत.