सांगली - 2019 च्या तुलनेत यंदाचे पुरामुळे झालेले नुकसान अधिक आहे. त्यामुळे अधिक नुकसान भरपाई मिळावी यासाठी सरकारवर दबाव आणून पुरग्रस्तांच्या मदतीसाठी संघर्ष करू, अशी भूमिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. भिलवडी या ठिकाणी पूर पाहणी प्रसंगी पूरग्रस्तांसोबत संवाद साधताना फडणवीस यांनी राज्य सरकारला हा इशारा दिला आहे.
हेही वाचा - राज्यातील हे २५ जिल्हे निर्बंधमुक्त होणार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची महत्त्वपूर्ण घोषणा
पूरग्रस्त भागाची फडणवीसांकडून पाहणी -
सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाहणी करण्यात येत आहे. तालुक्यातून फडणवीस यांनी पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. भिलवडी याठिकाणी देखील देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करत येथील पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला.
अधिक मदत आणि ती मिळेपर्यंत संघर्ष -
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, 2019 च्या प्रमाणेच हा महापूर आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात खूप मोठं नुकसान झाले आहे. सर्वसामान्य माणसापासून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान पाहायला मिळत आहे. 2019 मध्ये आपल्या सरकारच्या माध्यमातून एनडीआरएफच्या निकषापलीकडे सर्व पातळ्यांवर पूरग्रस्तांना, शेतकऱ्यांना मदत केली होती. या वेळीही अधिक नुकसान आहे, त्या पार्श्वभूमीवर अधिक नुकसान भरपाई मिळायला हवी. त्या दृष्टीने मदत मिळण्यासाठी राज्य सरकारवर आपला दबाव असेल आणि पूरग्रस्तांना मदत मिळेपर्यंत आम्ही संघर्ष करू, असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिला आहे.
हेही वाचा - भारतात येणार डिजीटल चलन, जाणून घ्या, फायदे आणि धोके
जलसंपदा खात्याचा अंदाज चुकल्याने सांगलीचे नुकसान -
राज्य सरकारने बहाणेबाजी बंद करावी, केंद्राकडे बोट करण्याऐवजी स्वतःची जबाबदारी पार पाडावी, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारला लगावला आहे. तसेच जलसंपदा खात्याचा अंदाज चुकल्याने यंदा सांगली जिल्ह्याचे नुकसान अधिक झाले, असा आरोपही फडणवीस यांनी केले आहे.
बहाणेबाजी बंद करून मदत करा -
केंद्र सरकारने जबाबदारी पार पाडावी असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले होते. त्यावर फडणवीस म्हणाले, राज्यातल्या तौक्ते आणि निसर्ग चक्रीवादळाच्या प्रसंगी केंद्राकडून निकषांच्या पलीकडे जाऊन मदत देण्यात आली आहे. गुजरातमध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याने त्या ठिकाणी अधिक मदत देण्यात आली. मात्र, प्रत्येक वेळी राज्य सरकारने केंद्राकडे बोट दाखवण्याऐवजी स्वतःची जबाबदारी पार पाडली पाहिजे, ती जबाबदारी झटकण्यात का येते? असा सवाल करत, राज्य सरकारने आता बहाणेबाजी बंद करावी, आम्ही सत्तेत असताना केंद्राच्या आणि निकषांच्या पलीकडे जाऊन राज्य सरकारच्या भरोशावर मदत केली आहे. महाराष्ट्र हे खंबीर राज्य आहे. यामुळे राज्य सरकारने आपली जबाबदारी पार पाडावी, असा टोला फडणवीस यांनी लगावला.