सांगली - म्हैसाळमध्ये गवा रेड्याचे दर्शन झाले आहे. शेतामध्ये धुमाकूळ घालत गव्याने अनेक पिकांचे नुकसान केले आहे. तर गावातील तरुणांनी गव्याला हुसकावून लावले आहे. पण गवा रेड्याच्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
ग्रामस्थांत भिती
मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे गवा रेड्याचे दर्शन झाले आहे. गावातील कुटवाड पाणंदजवळ राजू इंगळे यांच्या शेतामध्ये 11 वाजता गवा रेड्याचे दर्शन झाले. शेतामध्ये काम करत असताना ग्रामपंचायत सदस्य पुष्कराज शिंदे यांनी या गव्याला पाहिले. त्यांनी ग्रामस्थांना याबाबतची कल्पना दिली आणि तरुणांनी एकत्र येत या गव्याचा पाठलाग सुरू करत हुसकावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, गव्याने या ठिकाणी असणाऱ्या अनेक शेतात धुमाकूळ घालत पिकांचे नुकसान केले आहे. तर तरुणांनी या गव्याला हुसकावून लावले. मात्र गावामध्ये गवा दिसल्याच्या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने या गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
बिबट्या, गव्याचा जिल्ह्यात वावर
एक महिन्यापूर्वी सांगली शहरात गवा रेडा शिरला होता, तर दोन दिवसांपूर्वीच सांगली शहरात मध्यवर्ती भागात बिबट्या शिरला होता. गुरुवारी तासगावमध्ये दोन गवा रेड्यांचे दर्शन झाले होते. आता म्हैसाळमध्ये आणखी एक गवा रेडा दिसल्याने खळबळ उडाली आहे.