सांगली: शहरातल्या शामरावनगर जवळील एपीजे अब्दुल कॉलेजजवळ, बंदी असलेल्या व्हेल माशाची उलटीची विक्री करण्यासाठी काही व्यक्ती येणार अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शामराव नगर परिसरात सापळा रचून दोघा संशयितांना ताब्यात घेतले.
पाच कोटी 71 लाखाचा माल जप्त: सलीम पटेल, राहणार सांगली आणि अकबर शेख, राहणार कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. यावेळी दोघांनाही या ठिकाणी येण्याचे कारण विचारले तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अकबर शेख याची अंगझडती घेतली. त्याच्याजवळ पांढऱ्या बॉक्समध्ये पिवळसर व तांबूस रंगाचे 8 ओबडधोबड आयताकृती पदार्थ आढळून आले. यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्याकडून घटनास्थळी तपासणी केला. हे पदार्थ उलटी असल्याचे स्पष्ट झाले. साडेपाच किलो वजन या उलटीचे आढळले आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये याची सुमारे पाच कोटी 71 लाख इतकी किंमत आहे. हा पदार्थ जप्त करून या दोघांना अटक करण्यात आले आहे, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी: याबाबत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी म्हणाले की, सांगली पोलीस दलाकडून सांगली शहर पोलीस हद्दीत, वन्यजीव नियम 172, एक गुन्हा दाखल केला आहे. अंबरग्रीस हा पदार्थ जे व्हेल माश्याची उलटी म्हणून ओळखला जातो. साडे पाच किलो वजनाचा हा पदार्थ आहे. वन्यकायदा अंतर्गत हा पदार्थ प्रतिबंधित आहे. त्यामुळे यांची परस्पर देवाण-घेवाण करता येत नाही. पुण्यामध्ये एक सांगली आणि सिंधुदुर्ग येथील अशा दोन आरोपींना अटक करण्यात आले आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या पदार्थाची मोठी मागणी आहे. त्यामुळे याचा चोरटा बाजार होत असतो. प्राथमिक तपासामध्ये मालवणमधून हे व्हेल माशाचे उलटी विक्रीसाठी सांगलीमध्ये आणण्यात आली होते. याबाबत दोघांविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच स्थानिक वनविभाग आणि प्राणी मित्रांच्या माध्यमातून सांगली शहर पोलीस आता याबाबत अधिक तपास करत आहेत.
काय आहे व्हेल माशाची उलटी : व्हेल माशाची ही उलटी फ्लोटिंग गोल्ड समजली जाते म्हणजे तरंगते सोने. हा व्हेल माशाने उलटी केलेला एक सुगंधी पदार्थ असतो आणि तो नैसर्गिक परफ्युम्स बनवण्यात वापरला जातो. हा फार दुर्मिळ पदार्थ आहे. याची किंमत कोटी रुपयांत असते. पर्यावरण खात्याला भीती वाटते, की जर लोक या पदार्थाच्या मागे लागले, तर ते व्हेल माशांना त्रास देऊन पकडतील आणि पर्यायाने त्यांची संख्या कमी होईल. म्हणून या उलटीचा तस्करीला रोख लावून तस्करांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई केली जाते.