सांगली - तीन दिवसांपासून सांगलीकरांवर असणारे पाणीटंचाईचे संकट अखेर दूर झाले आहे. कृष्णा नदीच्या पात्रात कोयना धरणातून सोडलेले पाणी दाखल झाले. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
कोयना धरणातून पाणी सोडण्यात आले नसल्यामुळे कृष्णा नदी गेल्या तीन दिवसांपासून कोरडी पडली होती. त्याचा परिणाम सांगली शहरातल्या पाणी पुरवठ्यावर झाला होता. सांगलीसह उपनगरांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून तीन दिवसांपासून उपनगरांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. पाण्याचे टँकरवर होणारी गर्दी बघून सांगलीत दुष्काळ पडला आहे की काय? असे चित्र निर्माण झाले होते.
ही परिस्थिती लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाकडून कोयना धरण प्रशासनाला तातडीने पाणी सोडण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानंतर कोयना धरण प्रशासनाकडून कृष्णा नदीत पाणी सोडण्यात आले होते. ते आज सकाळी सांगलीच्या कृष्णा पात्रात दाखल झाले आहे. त्यामुळे कोरडी पडलेली कृष्णा नदी पुन्हा भरून वाहू लागली आहे. यामुळे सांगलीकरांवरील पाणी टंचाईचे संकट दूर झाले आहे.