सांगली - गेल्या ५ दिवसांपासून महापुराच्या विळख्यात सापडलेल्या कृष्णा काठाजवळची पाणी पातळी हळूहळू ओसरायला लागली आहे. सांगलीमधील महापूर ओसरत असून पाणीपातळी सध्या ५७ फुटांच्या खाली आलेली आहे. मात्र, अद्यापही पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आता पुन्हा युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे. यावेळी ब्रह्मनाळ बोट दुर्घटनेतील ३ मृतदेह सापडले असून मृतांचा आकडा १२ वर पोहोचला आहे. यामध्ये दोन महिला आणि एका अडीच वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. सुरेखा नरुटे आणि रेखा वावरे अशी या महिलांची नावे असून लहान मुलीचे नाव समजलेले नाही.
सांगलीतील पाण्याची पातळी शुक्रवारपासून कमी होत आहे. कृष्णा नदीतील पाणीपातळी शनिवारी सकाळपर्यंत जवळपास ५ इंचाहून अधिक कमी झाली आहे. तसेच शहरात शिरलेले पाणी एक ते दीड फुटाने कमी झाले आहे. महापूर ओसरत असला तर अद्यापही महापुराच्या विळख्यात हजारो नागरिक सापडलेले आहे. सांगली शहर. हरिपूर, सांगली वाडी, भिलवडी, अंकलखोप, कसबे डिग्रज, मौजे डिग्रज आदी नदीकाठच्या गावात नागरिक अडकलेले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी सकाळपासून एनडीआरएफ, आर्मीचे जवान तसेच सामाजिक कार्यकर्ते युद्धपातळीवर काम करीत आहेत.
पुराचा फटका बसलेल्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तू पुरवण्यात येत आहेत. पूरस्थिती हातळण्यासाठी प्रभारी अधिकारी म्हणून सांगली महापालिकेचे माजी आयुक्त रवींद्र खेबुडकर यांना पाचारण करण्यात आले आहे. आतापर्यंत जवळपास १ लाख ४० हजाराहून अधिक नागरिक, तर ४० हजाराहून अधिक जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
पूर ओसरत असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पाणीपातळी हळूहळू कमी होत असल्याने शहरातील पुराचा विळखा थोड्या-फार प्रमाणात कमी होईल, असे सांगण्यात येत आहे.