सांगली - जिल्ह्यात काँग्रेसची एकजूट झाल्यास जिल्ह्यात कमळ उगवणार नाही, असा विश्वास कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला. तसेच जिल्ह्याच्या गतीमान विकासासाठी एकदिलाने काम करु असेही कदम म्हणाले. सांगलीमध्ये आयोजित नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी विश्वजीत कदम बोलत होते.
राज्याच्या कृषी व सहकार राज्यमंत्रीपदी पलूस-कडेगावचे काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांची निवड झाली. या निवडीच्या निमित्ताने सांगली जिल्हा काँग्रेसकडून मंत्री विश्वजीत कदम यांचा सांगलीत भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडला. या सत्काराच्या निमित्ताने मंत्री विश्वजित कदम यांची सांगलीतून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जेसीबीने कदम यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर शहरातील स्टेशन चौक या ठिकाणी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचा सर्वपक्षीय नागरी सत्कार सोहळा पार पडला. यावेळी जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पदाधिकारी यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लागेल तो विकासनिधी देणार
जिल्ह्याच्या विकासासाठी लागेल तेवढी नीधी देणार आहे. विकासासाठी सर्व जीती धर्माच्या, सर्व पक्षाच्या लोकांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे विश्वजीत कदम म्हणाले. सांगलीमध्ये विकासाची काम आणणार असल्याचेही कदम म्हणाले.
सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते व वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील आणि मंत्री विश्वजित कदम यांच्या टोलेबाजी रंगल्याचे पाहायला मिळाले.