सांगली - काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांची मंत्रीमंडळात कृषी व सहकार राज्यमंत्रीपदी वर्णी लागल्याने सांगली जिल्हा काँग्रेसकडून त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आली. यावेळी कदम यांची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर झालेल्या सभेत विशवजीत कदम आणि माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांच्यात जोरदार टोलेबाजी झाल्याचे पाहायला मिळाले.
काय म्हणाले विशाल पाटील
विशाल पाटील यांनी आपल्या भाषणा दरम्यान दिवंगत पतंगराव कदम यांचा उल्लेख आंब्याचे झाड केला. या आंब्याच्या झाडाला आम्ही दगड मारत होतो, आणि आम्हाला आंब्याचा गोडवा मिळत होता. आज आंब्याच्या वृक्षाच्या पोटी विश्वजित कदम यांच्या रुपाने आंब्याचाच वृक्ष आलेला आहे. या आंब्याच्या झाडाला आम्ही दगडं मारलेली आहेत, पण आता या आंब्याचा गोडवा आम्हाला मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
काय म्हणाले विश्वजीत कदम
विशाल पाटील यांच्या भाषणाचा धागा पकडत विश्वजीत कदम यांनी बोलताना आंब्याच्या झाडाला दगड मारला, तर वर गेलेला दगड शेवटी खाली येऊन तुमच्यावरच पडतो. त्यामुळे विशाल पाटील तुम्ही आता दगड मारणे बंद करा, असा सल्ला यावेळी विश्वजीत कदम यांनी दिला.
..तर जिल्ह्यात कमळ उगवणार नाही
जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत जनतेच्या समस्या आहेत. त्या सोडवण्यासाठी एकदिलाने काम करण्याची गरज आहे. एकजूटीने काम केल्यास जिल्ह्यात कमळ उगवणार नाही, असे विश्वजीत कदम म्हणाले. तसेच विकास अधिक गतीने होईल असा विश्वास यावेळी मंत्री विश्वजित कदम यांनी व्यक्त केला.