सांगली - सांगली लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून वसंतदादा घराण्यातील व काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि महाआघाडीच्या नेत्यांनी आज (शनिवारी) सांगलीमध्ये याची घोषणा केली. यावेळी विशाल पाटीलही उपस्थित होते.
सांगली लोकसभेची जागा काँग्रेस की, स्वाभिमानी असा तिढा सुरुवातीला निर्माण झाला होता. मात्र, महाआघाडीत सांगलीची जागा स्वाभिमानीच्या वाट्याला गेली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे सांगली जिल्ह्यात तगडा उमेदवार नसल्याने भाजपच्या उमेदवारासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटना तगडा उमेदवार कोण देणार यावर चर्चा सुरू होती. अखेर स्वाभिमानीने वसंतदादा घराण्यात आपली उमेदवारी देऊ केली आहे.
वसंतदादांचे नातू काँग्रेसचे युवा नेते व माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांचे बंधू विशाल पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सांगलीमध्ये आज खासदार राजू शेट्टी यांनी विशाल पाटील यांच्यासोबत महाआघाडीच्या नेत्यांना घेऊन पत्रकार परिषदेमध्ये विशाल पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सांगली लोकसभेची जागा वसंतदादा घराण्यात होती. मात्र महाआघाडीच्या नेत्यांबरोबर चर्चा झाल्यानतंर ही जागा स्वाभिमानीला देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विशाल पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.