सांगली - ज्येष्ठ नेते अण्णा डांगे हे गेल्या काही दिवसांपासून धनगर एसटी आरक्षणप्रश्नी संभ्रम करणारी माहिती देत आहेत. 2014साली शरद पवार यांनी एसटी आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. पण समाजातील नेत्यांनी टीका केल्याने त्यांनी आरक्षण दिले नाही, असे अण्णा डांगे यांचे म्हणणे आहे. या संदर्भातील सत्य डांगे यांनी सांगावे, तसेच पुरावे द्यावेत, असे आवाहन धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केले आहे.
डांगे यांचे आरोप गंभीर
शरद पवारांच्या बाबतीत अण्णा डांगे यांनी सत्य सांगावे, माजी मंत्री अण्णा डांगे हे संस्थापक असलेल्या धनगर महासंघाची नुकतीच धुळे येथे राज्यस्तरीय बैठक झाली. धनगर महासंघाच्या बैठकीत अण्णा डांगे यांनी केलेले विधान धनगर समाजाच्या आरक्षणप्रश्नी अत्यंत महत्त्वाचे आहे. अण्णा डांगे हे अनेक वर्षे आमदार आणि कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत .त्यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला विशेष महत्त्व आहे. डांगे यांनी धुळे येथील बैठकीत बोलताना 'शरद पवार यांनी धनगर समाजाला एसटी आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. पण समाजातील नेत्यांनी टीका केल्याने आरक्षण दिले नाही, असे विधान केले आहे. 2014साली बारामतीत धनगर समाजातील कार्यकर्त्यांना पैसे देवून शरद पवारांच्या बदनामीसाठी मोर्चा काढण्यात आला, असेही डांगे यांनी म्हटले आहे. डांगे यांचे हे आरोप गंभीर आहेत. समाजाचे प्रश्न गतीने सुटण्यासाठी या आरोपांची पोलखोल होणे आवश्यक आहे. या संबंधाने उपस्थित झालेल्या प्रश्नांची उत्तरे मिळणे गरजेचे आहे.
'मग पवार आता का आरक्षण देत नाहीत?'
2014साली विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर बारामतीत धनगर समाजाचे मोठे आंदोलन झाले. तत्पूर्वी शरद पवार यांनी आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता, असे डांगे यांचे म्हणणे आहे. मात्र वस्तुस्थिती फार वेगळी आहे. शरद पवार यांनी असा निर्णय घेतला होता, असे डांगे व्यतिरिक्त कोणालाही माहिती नाही. तसे अद्याप कुणी जाहीर केले नाही. स्वत: पवार यांनी असे कधी म्हटलेले नाही. महत्त्वाची बाब म्हणजे, असे आरक्षण देण्याचा अधिकार असलेल्या घटनात्मक पदावर त्यावेळी शरद पवार नव्हते. काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पवार यांचा पक्ष सत्तेत सहभागी होता. मात्र त्यावेळी राष्ट्रवादीनेही कधी आरक्षणाचा निर्णय घेतल्याची जाहीर भूमिका सांगितली नाही. त्यामुळे पवारांनी निर्णय घेतला होता, या म्हणण्याला काहीही अर्थ नाही. शिवाय पवार यांच्यावर टीका केल्याने त्यांनी आरक्षण दिले नाही, हे म्हणणेही हास्यास्पद आहे. यातून समाजाता फक्त संभ्रम निर्माण होत आहे. शरद पवारांच्या हातात असताना त्यांनी आरक्षण दिले नाही, असा याचा स्पष्ट अर्थ होतो आहे. पृथ्वीराज चव्हाणांच्या सरकारपेक्षा उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये पवारांच्या शब्दाला सर्वाधिक किंमत आहे. मग पवार आता का, आरक्षण देत नाहीत? त्यामुळे यासंबंधीचे नेमके सत्य अण्णा डांगे यांनी समाजाला सांगावे. 2014साली पवारांनी आरक्षण देण्याचा निर्णय कुठे आणि केव्हा घेतला होता, हे पुराव्यानिशी जाहीर करावे, असे आवाहनही ढोणे यांनी केले आहे.