सांगली - शहरातील एका अभियंता दाम्पत्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय बनावटीच्या व्हेंटिलेटरची निर्मिती केली आहे. शासनाच्या मान्यतेनंतर भारतीय बनावटीच्या व्हेंटिलेटरचे उत्पादन करण्याचा मानस या मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या दाम्पत्याने व्यक्त केला आहे. प्रसाद आणि आदिती कुलकर्णी, असे या दाम्पत्याचे नाव आहे.
देशभरात कोरोनाने थैमान घातले असून अनेक देशामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेला आकडा भीषण असून तो अजून वाढत आहे. या निमित्ताने जगभरात व्हेंटिलेटरच्या कमतरतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना बधितांचा आकडा झपाट्याने वाढल्याने आणि जेवढे रुग्ण वाढले तेवढी उपचार यंत्रणा आणि खासकरून व्हेंटिलेटर नसल्याने मृत्यूचा आकडा वाढत आहे. तर भारतातही सध्या कोरोनाचे रुग्ण व मृतांचा आकडा वाढत आहे. विशेषतः महाराष्ट्रामध्ये कोरोना बाधित रुग्ण आणि मृतांची संख्या देखील वाढत आहे. हाच धोका ओळखून सांगलीतील वैद्यकीय उपकरणे बनवणऱ्या प्रसाद आणि आदिती कुलकर्णी यांनी स्वदेशी कंप्रेसरचलीत व्हेंटिलेटर बनवले आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या तोडीचे रिझल्ट देणारे हे भारतीय बनावटीचे व्हेंटिलेटर तयार करण्यात आले आहे.
शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि सांगलीतील कोरोनाच्या साथीला आळा घालण्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या विशेष वैद्यकीय अधिकारी पल्लवी सापळे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. संजय साळुंखे यांनी या व्हेंटिलेटरची पाहणी केली आहे. तसेच त्यांनी सुचवलेले बदल या व्हेंटिलेटरमध्ये करण्यात आले आहेत. याबरोबरच सांगलीतील एका रुग्णाची शस्त्रक्रिया करत असताना या व्हेंटिलेटरचा वापर सुद्धा केला गेला आहे.
शासनाच्या तांत्रिक समितीच्या सुचनेनुसार हे व्हेंटिलेटर तयार करण्यात आले असून हे मशिन मान्यतेसाठी शासनाच्या तांत्रिक समितीकडे पाठवण्यात आले आहे. तर मान्यता आल्यानंतर या मशिनचे उत्पादन सुरु करण्याचा मानस कुलकर्णी दाम्पत्याने व्यक्त केला आहे. या व्हेंटीलेटरबाबत सांगलीतील डॉ. संजय कुलकर्णी यांनी समाधान व्यक्त केले आहे. व्हेंटिलेटरची कमतरता पाहता कुलकर्णी दाम्पत्याने तयार केलेले व्हेंटिलेटर अत्यंत उपयुक्त असल्याचेही डॉ. संजय कुलकर्णी यांनी सांगितले आहे.