सांगली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागली आहे. सांगली जिल्ह्यातील कडक संचारबंदीची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र भाजीपाला खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असल्याचे चित्र पालिका क्षेत्रात सगळीकडेच पाहायला मिळत आहे. त्यामुळे महापालिकेने पालिक क्षेत्रात आता 18 ठिकाणी तात्पुरते भाजीपाला विक्री केंद्र सुरू केले आहेत.
संचारबंदी असल्याने भाजीपाला खरेदीबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज निर्माण होत आहेत. दोन दिवसांपासून सांगली आणि मिरजेत भाजीपाला विक्रीच्या ठिकाणी खरेदीसाठी तोबा गर्दी होत आहे. गर्दी टाळण्यासाठी पोलिसांना नाईलाजास्तव लाठीचार्ज करावा लागत आहे. तसेच भाजीपाला बाजार बंद करण्याची वेळ येत आहे.
याठिकाणी असतील भाजीपाला केंद्र...
भाजीपाला विक्री हे बंद राहणार नसल्याचे प्रशासनाकडून वारंवार सांगूनसुद्धा नागरिक एकाचवेळी खरेदीसाठी झुंबड करत आहेत. त्यामुळे या परिस्थितीत पालिका प्रशासनाने येताना महापालिका क्षेत्रातील 18 ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचे ठराविक वेळेसाठी नियमित भाजीपाला विक्री केंद्र सुरू केले आहेत. संचारबंदी काळात याठिकाणी सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत भाजीपाला विक्री केंद्र नागरिकांसाठी सुरू राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांना गोंधळून न जाता दिलेल्या ठिकाणी नियमित वेळेनुसार गर्दी न करता भाजीपाला खरेदी करावेत, असे आवाहन पालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.