इस्लामपूर(सांगली) - संपूर्ण जगभरात आज (26 सप्टेंबर) जागतिक कन्या दिन साजरा केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर इस्लापूरमधील एका बुरूड समाजातील कन्येने सागरावर स्वार होण्याचे स्वप्न पूर्ण केले. अत्यंत प्रतिकुल परिस्थिती राहणाऱ्या मुलीने उच्च शिक्षण घेऊन उत्तुंग भरारी घेतली. शिक्षणासाठी मुलगी आणि तिच्या कुटुबीयांनी भाजीपाला विक्री करणे, कपडे इस्त्री करण्याच्या कामाबरोबर वेळ प्रसंगी या मुलीच्या आईने मुलीच्या शिक्षणासाठी धुणीभांडी करण्याचेही काम केले आहे. या संगळ्यांच्या कष्टाचे चीज करत त्या मुलीने आज हाँगकाँगमधील एका कंपनीत नेव्हल ऑफिसर म्हणून सेवेत रुजू होत आपले स्वप्न पूर्ण केले आहे. राधिका सूर्यवंशी असे तिचे नाव आहे. आज कन्या दिनाच्या निमित्ताने ईटीव्ही भारतचा राधिका सूर्यवंशीच्या थक्क करणाऱ्या शैक्षणिक प्रवासावरचा हा विशेष वृत्तात..
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे राधिका एका गरीब व मूकबधिर बापाच्या व अशिक्षित आईच्या पोटी जन्माला आलेली मुलगी म्हणजे राधिका सूर्यवंशी होय. लहानपणासापासूनच हुशार व जिद्दी होती. आई बाप जरी अशिक्षित असले तरी त्यांची राधिकाला शिकवण्याची आणि राधिकाची शिकण्याची जिद्द मात्र अफाट होती. याच जिद्दीच्या जोरावर आईने राधिकाला सुरुवातीला चौथीपर्यंत शिकवले. राधिका शाळेत हुशार असल्याने पुढे तिची पलूस येथील नवोदय शिक्षण संस्थेत तिची पुढील शिक्षणासाठी निवडही झाली.
आईला जावे लागले तुरुगांत-
राधिकाने आपल्या हुशारीच्या जोरावर नवोदयमध्ये प्रवेश मिळवला. मात्र तिथे तिला निवासी पद्धतीने वसतिगृहात राहुन शिक्षण घ्यावे लागणार होते. मात्र मूकबधिर असलेलेले राधिकाचे वडिल यांचा आणि त्यांच्या आईचा काही तर गैरसमज झाला. राधिकाच्या शिक्षणासाठी धडपडणारी आई तिला कुठेतरी हॉस्टेलला दूर पाठवत असल्याचा गैरसमजातून त्यांनी राधिकाच्या आईची पोलिसात तक्रार दाखल केली. त्यामुळे राधिकाच्या आईला थेट पोलीस कोठडीत जावे लागले. मात्र मंत्री जयंत पाटील यांना ही माहिती समजताच त्यांनी राधिकाच्या आईला सन्मानाने बाहेर काढून तिचा सत्कार केला आणि राधिकला शिक्षणासाठी पलूस येथे पाठवले.
नवोदयमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी राधिकाच्या शिकवणीसाठी लागणारी फी देण्यासाठी तिच्या आईकडे अवघे 2000 रु सुद्धा नव्हते. मात्र मुलीच्या शिक्षणासाठी राधाच्या आईने शिकवणी घेणाऱ्या सरांच्या घरीच धुणी भांडी करण्याची तयारी दर्शवली. शिक्षणासाठी आई आणि मुलीचा हुरूप पाहून शिकवणी घेणारे शिक्षक मोहन पाटील यांनीही हसत हसत राधाला शिकवणीसाठी प्रवेश दिला. यावेळी नवोदय मध्ये ग्रामीण भागातील सुमारे पाच हजार विध्यार्थी शिक्षण घेत होते. यामधून 80विद्यार्थ्यांची निवड होणार होती. या इंशी मध्ये जिगरबाज राधिकाने नवोदय मध्ये निवड करून दाखवली.
पुढील शिक्षणासाठी 6 लाखांचा डोंगर, बुरूड समाज धावला
राधिका सुरुवातीपासूनच अधिकारी बनण्याची स्वप्ने पाहत होती. यामुळे बारावीनंतर याच जिद्दीने तिने मर्चंट नेव्हीची परीक्षा पास केली. तिच्या घरच्यांना पण तिची स्वप्ने पूर्ण वाटत होती. पण पुढील शिक्षणासाठी तिला 6 लाख रुपये लागणार होते. महिन्याला 6 हजार रुपये कमाई असलेल्या राधाच्या कुटुंबाला इतकी रक्कम आणायची कोठून असा महाप्रश्न पडला होता. घरात आधी लोकांची कपडे इस्त्री करायची त्यातून पैसे मिळवायचे, मग शाळा शिकायची, असे एकंदरीत दिवस सुरू होते अश्या परिस्थितीत सुद्धा सहा लाख एवढा खर्च उचलण्याचा विडा राधा च्या भावाने उचलला. इकडून तिकडून बचत गटाची कर्ज प्रकरने करून 2 लाख रु जमवले. त्यानंतरच्या रकमेसाठी राधाने सोशल मीडियावरून आपल्या बुरुड समाजातील लोकांनकडे मदतीची हाक दिली आणि बुरुड समाज देवासारखा धावून आला.
अन् तिचे स्वप्न साकार झाले-
आपल्या वंचित समाजातील एक मुलगी चक्क नेव्ही मध्ये जात आहे, म्हटल्यावर समाजाने आपला दातृत्वाचा हात पुढे केला. कुणी 100 कुणी 200 कुणी 500 कुणी 1000 हा हा ...म्हणता लोक मदत करू लागले, अश्या प्रकारे राधाचे शिक्षणाचा सर्व खर्च जमा झाला. या सगळ्या मदतीच्या जोरावर आणि लोकांच्या मदतीची जाण ठेवत जिगरबाज राधिकाने बीएस्सी(नॉटिकल सायन्स) पदवी संपादन केली. इतके होऊन ही ट्रेनींगला जाण्यासाठी तिने कोरोनाच्या काळात सर्व काही बंद असताना घरोघऱी फिरून लोकांचे कपडे गोळा करत इस्त्री करून ती घरपोच करून देण्याचे काम निरंतर सुरू ठेवले. तसेच काही वेळेस सायकलवर फिरून भाजीपाला विक्री करत पैशाला पैसा जोडला आणि घरातील उदरनिर्वाह चालवून स्वतःसाठी पैशे जमा केले.
राधिकाच्या या शिक्षणाच्या प्रवासात तिच्या आई इतकीच तिच्या भावाचीही मोलाची साथ मिळाली. या सगळ्यांच्या मदतीने नॉटिकल सायन्सची पदवी मिळवलेल्या राधिकाने थेट हॉंगकॉंगच्या BSM कंपनी मध्ये नेविगेटिंग डेक ऑफिसर या उच्च पदाची नोकरी मिळवली. सगळ्यांच्या प्रयत्नांचे तिने चीज करून दाखवले. नऊ महिन्यांपासून ती या कंपनीत रुजू आहे सध्या तिचे प्रशिक्षण दरम्यान तीने ओस्ट्रेलिया ते चायना प्रवास जहाजातून यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. या माध्यमातून राधिकाने आपल्या मेहनतीवर नेव्हीमर्चंट पोलीस अधिकारी आणि आर्मी मध्ये जाऊ इच्छिणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक मुलीनी राधिकाचा आदर्श घेण्यासारखा आहे. मी एक मुलगी आहे मला हे जमतच नाही मी हे काम कसे करू असे म्हणाऱ्या समोर एक आदर्श राधिकाने ठेवला आहे.
हेही वाचा - जागतिक कन्या दिन : युवतींसाठी प्रेरणास्रोत मंगळवेढा विभागातील तरुण महिला अधिकारी राजश्री पाटील
हेही वाचा - Ganeshotsav 2021 : 'या' शहरात कन्यांच्याच हस्ते केली जाते गणरायाची पूजा