सांगली - पुणे पदवीधर निवडणुकीतील मतदानावर संघर्ष सफाई व इतर संघटित आणि असंघटित कर्मचारी संघटनेकडून बहिष्कार टाकण्यात आला आहे. निवडणुकीत कोणत्याही पक्षाकडे आणि त्यांचे उमेदवार असणारे साखर सम्राट यांच्याकडे सफाई कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबातील पदवीधरांच्यासाठी कोणताही अजेंडा नाही. यामुळे हा बहिष्कार घालण्यात येत आहे. तसेच पदवीधरांनी सुद्धा मतदानावर बहिष्कार घालावा, असे आवाहन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष महेशकुमार कांबळे यांनी केले आहे. येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
साडेचार लाखांहून अधिक मतदार -
पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीची धामधूम सुरू आहे. भाजपा, महाविकास आघाडी, मनसे, वंचित बहुजन आघाडी आदी. पक्षासह 62 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणुकीसाठी एक डिसेंबरला मतदान पार पडणार आहे. पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यातील 4 लाख 50 हजारांहुन अधिक पदवीधर निवडणुकीत मतदान करणार आहेत. सर्व पातळ्यांवर सर्व उमेदवारांकडून प्रचार सुरू आहे.
पदवीधर सफाई कर्मचाऱ्यांसाठी नाही अजेंडा -
महाराष्ट्र राज्य आणि पदवीधर मतदार संघातील मागासवर्गीय समाजातील पदवीधर तरुण कायम कंत्राटी स्वरुपात सफाई कर्मचारी म्हणून काम करत आहेत. तसेच सफाई कर्मचाऱ्यांची मुले पदवीधर आहेत, या अशा कर्मचाऱ्यांची संख्या पुणे पदवीधर मतदारसंघ यामध्ये सुमारे 39 हजार इतकी आहे. पाच महापालिकांमध्ये ते कर्मचारी आणि गाव पातळीवर विखुरलेले आहेत. मात्र, या कर्मचारी या पदवीधर कर्मचारी किंवा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील पदवीधर मुलांच्यासाठी एकाही पक्षाकडून अथवा उमेदवारांकडून ठोस भूमिका अथवा अजेंडा जाहीर करण्यात आलेला नाही.
पदवीधरांच्या प्रगतीसाठी महामंडळांना शून्य निधी -
किंबहुना भाजपा असेल किंवा सध्याच्या महाविकास आघाडी सरकार या पक्षांनी गेल्या पाच वर्षात बहुजन समाजातल्या पदवीधरांच्या प्रगतीसाठी असणाऱ्या आर्थिक विकास महामंडळाना एक रुपयाचाही निधी दिला नाही. यामुळे हे लोक आता पदवीधरांचा काय विकास करणार? असा सवाल संघटनेचे प्रदेशाध्यक्ष महेश कुमार कांबळे यांनी केला आहे.
हेही वाचा - कोल्हापूरचे कार्यालय दुसरीकडे हलविण्याचा वर्षा उसगावकरांचा डाव; राजेभोसलेंचा गंभीर आरोप
साखर सम्राटांचा आणि पदवीधर संघाचा काय संबंध?
भाजपा आणि महाविकास आघाडीकडून साखर सम्राटांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, त्यांचा या मतदारसंघाशी काहीही संबंध नाही. त्याचबरोबर या दोन्ही उमेदवारांना पदवीधरांच्या प्रश्नाची कोणतेही जाण नाही. किंबहुना त्यांच्याकडे पदवीधरांच्या विकासासाठी कोणताही ठोस दृष्टिकोनही नाही. तसेच या मतदारसंघातील पदवीधर सफाई कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील पदवीधर यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची भूमिका जाहीर करण्यात आली नाही, असा आरोपही कांबळे यांनी केला. त्यामुळे या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय संघर्ष सफाई व इतर संघटित आणि असंघटित कर्मचारी संघटनेकडून घेण्यात आला आहे, असे त्यांनी जाहीर केले आहे.
बहिष्कारासाठी पदवीधरांमध्ये जागृती मोहीम -
या निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार घालण्यासाठी पदवीधर मतदार संघातील महापालिका क्षेत्रापासून गाव पातळीवर काम करणाऱ्या सर्व पदवीधर सफाई कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील पदवीधर यांच्यापर्यंत विविध पातळ्यांवर पोहचून मतदानावर बहिष्कार करण्याचे आवाहन केले जात आहे.