सांगली - जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. तर शिराळा आणि कडेगाव तालुक्यातील काही भागात गारांचा पाऊस झाला आहे. अवकाळी पावसाने सांगली लोकसभेच्या निवडणूकीतील सर्व पक्षांच्या उमेदवारांच्या आजच्या प्रचारावर पाणी फिरविले आहे.
जिल्ह्यात शनिवारी सांयकाळनंतर अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यातील शिराळा,कडेगाव,वाळवा,तासगाव, मिरज तालुक्यासह सांगली शहर परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. अचानक वातावरणात बदल होऊन सोसाट्याचा वारा सुटला. दुपार पर्यंत उकाड्याने सांगलीकर हैराण झाले होते. अचानक झालेल्या ढगाळ हवामान आणि वादळी वाऱ्यामुळे त्यांची धांदल उडाली होती.
काही ठिकाणी घरांचे पत्रे उडाले-
सोसाट्याचा वाऱ्यामुळे काही भागात आणि रस्त्यावर झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तर अनेक घरांचे पत्रे उडून गेले आहेत, तर द्राक्षबागांचे मंडप पडले आहेत. तर या वादळी वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित ठेवण्यात आला होता.या वादळी वाऱ्याबरोबर अवकाळी पाऊस बरसला आहे.तर सांगली शहरासह जिल्ह्यातील पश्चिम भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडला आहे.तर शिराळा येथे गारांचा पाऊस झाला आहे.
सांयकाळी पाचनंतर वातावरणात झालेल्या बदलाचा फटका लोकसभा निवडणुकीतील शनिवारी प्रचाराला बसला आहे. सर्वच पक्षांच्या ठिकठिकाणी होणाऱ्या सभांवर पावसाचा परिणाम झाला.