जत (सांगली) - तालुक्यातील पूर्व भागात सोमवारी अवकाळी पाऊस तसेच गारपीट झाली. विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने सोमवारी सायंकाळी उमदी परिसरात थैमान घातले. गारांसह पाऊस झाल्याने याचा फटका द्राक्षे, शेडवरील बेदाणा, डाळिंब आणि इतर काढणी केलेल्या पिकांना बसला आहे. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा हैराण झाला आहे.
उमदी येथील अमगोंडा माशाळ यांच्या बेदाणा शेडमध्ये पावसामुळे पाणी गेल्याने साधारण सहा लाखांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ महसूल विभागाकडून शेती पिकांचे पंचनामे करावेत आणि अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला योग्य न्याय देऊन मोबदला द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. जत तालुक्यातील पूर्व भागातील बेळोडगी, उमदी हळ्ळीसह अन्य काही भागांतही असाच सोमवारी सायंकाळी तब्बल एक तास वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला. या वादळी वाऱ्यामुळे रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे बेदाना शेड जमीनदोस्त झाले आहेत.
हेही वाचा - वांद्र्यातील जमावावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या धास्तीने भयभीत, लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेली जनता आणि हाताला काम नसल्याने बेजार असलेला बेरोजगार नागरिक पुर्णतः वैतागलेले आहेत, असे असतानाच सोमवारी अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.