सांगली - तासगाव तालुक्यातील येळावी येथे एका द्राक्ष बाग शेतीवर तणनाशक फवारून द्राक्षाचे घड तोडल्याचा प्रकार घडला आहे. शहाजी कोळी, असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्या एक एकर शेतातील द्राक्षबागेचे नुकसान करण्यात आले आहे. त्यामुळे कोळी यांचे सुमारे 5 लाखांचे नुकसान झाले आहे.
तासगाव तालुक्यातील येळावी येथील शहाजी कोळी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेचे काही अज्ञातांकडून नुकसान करण्यात आला आहे. कोळी यांची सुमारे एक एकरावर द्राक्षबागेची शेती बहरली होती. मात्र, मंगळवारी (दि.14 जाने.) रात्रीच्या सुमारास काही अज्ञातांनी त्यांच्या बागेवर हल्ला चढवत द्राक्ष वेलीवर तणनाशकाची फवारणी केली. त्यानंतर हातातोंडाशी आलेले द्राक्षघड तोडण्यात आले आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी कोळी यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोळी यांच्या द्राक्ष बागेत जाऊन पाहणी केली. तसेच कोळी यांच्याकडून याबाबतची माहिती घेतली. तासगाव पोलिसांनी याठिकाणी पाहणी करत पंचनामा केला आहे.
काही अज्ञातांनी जाणून बुजून हे कृत्य केले असल्याचा आरोप यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी. त्याचबरोबर कोळी यांचे सुमारे 5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने कोळी यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही खराडे यांनी यावेळी केली आहे. विक्रीसाठी हातातोंडाशी आलेले द्राक्षे अशा पद्धतीने काही विकृत लोकांनी तोडून टाकल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी हळहळ व्यक्त करत आहेत.