सांगली - टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावर केलेल्या पोस्टच्या वादातून मिरज शहरात दोघांवर खूनी हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. मिरज शहर पोलीस ठाण्याच्या समोरच भर दिवसा हा प्रकार घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. कोयत्याच्या सहाय्याने हल्ला केल्याने दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. युनूस नदाफ आणि इम्रान नदाफ अशी दोघा जखमी तरुणांची नावे आहेत. तर मोहसीन पठाण असे हल्ला करणाऱ्याचे नाव आहे.
फेसबुक पोस्ट डिलीट करण्याचे कारण-
याबाबत अधिक माहिती अशी , जखमी युनूस नदाफ याने टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त फेसबुकवर शुभेच्छा देणारी जाहिरात पोस्ट केली होती. मात्र, हल्लेखोर मोहसीन पठाण याने या पोस्टवर आक्षेप घेत पोस्ट डिलीट करण्यास युनूस नदाफ याला संगितले. मात्र युनूस नदाफ याने त्याला पोस्ट काढून टाकण्यास नकार दिला होता. त्यानंतर रविवारी मिरज शहर पोलीस ठाण्याच्या समोर असणाऱ्या बस स्टॉप जवळ युनूस नदाफ आणि इम्रान नदाफ हे दोघे जण थांबले होते. त्यावेळी मोहसीन पठाण हा देखील त्या ठिकाणी आला होता.
आरोपी घटनास्थळावरूनच जेरबंद-
मोहसीन याने फेसबूक पोस्टवरून युनूस याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. या वादावादीमध्ये मोहसीन याने आपल्या जवळच्या कोयत्याने युनूस आणि इम्रान यांच्यावर हल्ला केला. ज्या मध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. यावेळी कोयत्याने मारहाण सुरू असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत हल्लेखोर मोहसीन पठाण याला ताब्यात घेतले. तसेच तर या हल्ल्यात जखमी झालेले युनूस नदाफ व इम्रान नदाफ यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस ठाण्याच्या समोरच हा खुनी हल्ला केल्याची घटना घडल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.