सांगली - सरकारी योजनेच्या नावाखाली लुबाडणुकीचा प्रकार मिरजेच्या बेडग येथे उघडकीस आला आहे. 'पंतप्रधान बेटी बचाव, बेटी पढाव' अभियानाचे बोगस अर्ज भरून पैसे उकळण्याचा हा उद्योग सुरू होता. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी २ महिलांना ताब्यात घेतले आहे.
केंद्र सरकारच्या 'पंतप्रधान बेटी बचाव, बेटी पढाव' या अभियाना अंतर्गत बेडग गावात मुलींसाठी सरकारकडून २ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळत असल्याचे सांगून २ महिला या योजनेसाठी अर्ज भरून घेत होत्या. प्रत्येकी ५० रुपये घेऊन हा अर्ज भरण्यात येत होता. याबाबत गावातील सामाजिक कार्यकर्त्यांना संशय आल्याने त्यांनी अर्ज भरून घेत असलेले केंद्र गाठत याबाबत विचारणा केली. यावेळी समाधानकारक उत्तर मिळू न शकल्याने ग्रामस्थांनी पोलिसांना बोलावून घेतले. यानंतर मिरज पोलिसांनी या ठिकाणी अर्ज भरून घेणाऱ्या २ महिलांना ताब्यात घेतले. तर हा सर्व बोगस प्रकार असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. ३ दिवसांपासून हा फसवणुकीचा प्रकार सुरू होता. या दरम्यान जवळपास ५०० हुन अधिक अर्ज भरून घेण्यात आले आहेत.
तसेच योजनेतील पैसे जमा होण्यासाठी राष्ट्रीय बँकेत खाती आवश्यक असल्याचे सांगण्यात आले होते. तर अनेकांची खाती नसल्याने १० हजार रुपये भरून राष्ट्रीय बँकेत खाती उघडून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर शासकीय योजनेच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी बेडगमधील सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. तर या प्रकरणी उशिरापर्यंत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.