सांगली - अवैध माती उत्खनन प्रकरणी मिरजेच्या म्हैसाळ येथील दोन मंडल अधिकाऱयांसह एका महिला तलाठीला निलंबित करण्यात आले आहे. कोट्यवधी रुपयांची माती चोरी प्रकार समोर आल्याने जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी हा कारवाईचा बडगा उगारला आहे. दरम्यान याप्रकरणी दोन वरिष्ठ अधिकार्यांचीही विभागीय चौकशी होणार असल्याचे बोलले जात आहे. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये राजू जाधव, राजु कदम हे दोन मंडल अधिकाऱयांसह तलाठी वैशाली वाले यांचाही समावेश आहे.
मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील सहा शेतकर्यांना महसूल विभागाने माती उपसा करण्यास परवानगी दिली होती. मात्र, त्याठिकाणी बेसुमार माती उपसा केल्यामुळे कृष्णा नदीकाठ खचल्याचा प्रकार समोर आला होता. याबाबतच्या तक्रारी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. त्यानंतर मिरज प्रांताधिकारी विकास खरात आणि तहसीलदार शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नियुक्त केली होती. या समितीच्या चौकशीत सुमारे 16 हजार 434 ब्रास माती उपसा करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते.
याप्रकरणी संबधित शेतकर्यांना 5 कोटी 15 लाख रुपये दंडाच्या नोटिसा बजावत, वीटभट्टी चालकांसह 23 जणांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्या तपासात म्हैसाळचे दोन मंडल अधिकारी व तलाठीही दोषी असल्याची बाब समोर आल्याने या अहवालानंतर जिल्हाधिकाऱयांनी राजू जाधव, राजु कदम आणि तलाठी वैशाली वाले यांना निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान निलंबित करण्यात आलेला एकजण महसूल संघटनेचा पदाधिकारी आहे. त्यामुळे कर्मचार्यांमध्ये खळबळ उडाली आहे, तर या प्रकरणी आणखी दोन वरिष्ठ अधिकाऱयांची चौकशी होणार असल्याचे बोलले जात आहे.