सांगली : सिद्धार्थ परसू कांबळे आणि सदाशिव बाबू कांबळे, हे दोघे जत तालुक्यातील गुगवाड येथील राहणारे आहेत. दोघेजण कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील संकपाळ वीटभट्टी येथे कामागर म्हणून काम करत होते. या दोघांचे नातेवाईक हे मिरज शहरानजीकच्या कोल्हापूर महामार्गावरील धामणी या ठिकाणी राहतात. रविवारी कामाला सुट्टी असल्याने नातेवाईकांना भेटण्यासाठी धामणी या ठिकाणी आले होते. नातेवाईकांच्या भेटीनंतर दोघेजण दुचाकीवरून परत निघाले, त्यावेळी कोल्हापूर महामार्गावर पोहचले. मात्र चुकीच्या बाजूने निघाले असता महामार्गावरील पेट्रोल पंपाजवळ पोहचले, असताना मिरजेतून कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या भरधाव इनोव्हा वाहनाची आणि दुचाकीची समोरो-समोर धडक झाली. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
रक्तस्त्राव होऊन दोघांचा जागीच मृत्यु : ही धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीवरील सिद्धार्थ परसू कांबळे आणि सदाशिव बाबू कांबळे हे दोघेजण गाडीवरून उडून रस्त्यावर आपटले गेले. ज्यामध्ये डोक्याला गंभीर मार लागला. त्यामुळे प्रचंड रक्तस्त्राव होऊन दोघांचा जागीच मृत्यु झाला. दोन्ही गाड्यांच्या या भीषण अपघातानंतर आसपासच्या नागरिकांना धाव घेतली. तर अपघातात इनोव्हा गाडीत असणारे किरकोळ जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
गाडीचा दर्शनी भागाचा चक्काचूर : घटनेची माहीती मिळताच मिरज ग्रामीण पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचा पंचनामा करण्यात आला. सिद्धार्थ परसू कांबळे आणि सदाशिव बाबू कांबळे या दोघांचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यानंतर अपघातातील वाहने बाजूला करत महामार्गावर विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. तर अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या भीषण अपघातात दुचाकी आणि इनोव्हा गाडीचा दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे. या अपघाताची नोंद मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली. अधिक तपास पोलीस करत आहेत. दोघा जिवलग मित्रांच्या एकाच वेळी मृत्यूच्या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
बहिणीला भेटून निघाले होते : सिद्धार्थ परसू कांबळे आणि सदाशिव बाबू कांबळे हे दोघेही एकाच गावातील असल्याने जिवलग मित्र होते. दोघेही एकाच ठिकाणी काम करत होते. सिद्धार्थ याची बहीण ही धामणी या ठिकाणी राहत होती, तिला भेटण्यासाठी हे दोघेजणी रविवारी सुट्टीच्या निमित्ताने गेले होते. बहिणीला भेटून पुन्हा आपल्या कामाच्या ठिकाणी मुक्कामासाठी निघाले असताना हा भीषण अपघात घडला.