सांगली - विट्यासह परिसरात रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. यावेळी विटा शहरापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असणार्या घाडगेवाडी येथील म्हसोबाच्या डोंगरावर जनावरे चरायला घेऊन गेलेल्या सिद्धाराम भिमराय जगदाळे (वय 27 वर्षे, मूळगाव रा. सुर्गाई, जि.इंडी, कर्नाटक) आणि त्याच्यासोबत असणार्या मल्लू (पूर्ण नाव मिळाले नाही) या दोन तरूणांच्या अंगावर वीज कोसळल्याने दोघेही जागीच ठार झाले. याबाबत विटा पोलिसांत पोलीस पाटील सुदाम घाडगे यांनी तक्रार दिली आहे.
हेही वाचा - चंद्रकांत पाटलांच्यात दम होता, तर 'तेथे' का हिसका दाखवला नाही - अण्णासाहेब डांगे
याबाबत पोलिसांकडून दिलेली माहिती अशी की, वीज अंगावरून पडून मृत्यू झालेले सिद्धाराम जगदाळे आणि मल्लू हे दोघे तरुण घाडगेवाडी येथील गलाई व्यावसायिकाकडे सालगडी म्हणून कामास आहेत. दरम्यान रविवारी दुपारी जनावरे चरण्यासाठी घेऊन डोंगरावर ते दोघेही गेले होते. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाल्याने या दोघांनी एका बाभळीच्या झाडाचा आश्रय घेतला. यावेळी अचानक वीज अंगावर कोसळल्याने त्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. त्यांच्या शेजारील शेतात काम करणार्या शेतकर्यांनी वीज पडलेल्या ठिकाणी धाव घेतली असता. ते दोघेही मृत झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच विटा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करून पंचनामा केला. यानंतर गावकर्यांच्या मदतीने पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. वीज अंगावर कोसळून दोघांचा मृत्यू झाला असताना दुसरीकडे घटनास्थळाजवळ असणार्या गावकर्यांच्या हातातील मोबाईल फोन देखील विजेच्या धक्क्यामुळे जळाला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कोमल पवार करीत आहेत.