सांगली - सांगलीच्या कारागृहातील दोन कोरोनाबाधित कैदी क्वारंटाइन सेंटरमधून फरार झाले आहेत. राजू कोळी आणि रोहित जगदाळे असे या पलायन केलेल्या कैद्यांची नावे आहेत. त्यांच्या शोधासाठी सांगली पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे.
सराईत गुन्हेगार असणाऱ्या राजू कोळी आणि रोहित जगदाळे या दोघांना दरोड्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची सांगलीच्या कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली. 19 सप्टेंबर रोजी या दोघांची कोरोना चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. रविवारी पहाटेच्या सुमारास या दोघांनी खोलीतील खिडकी तोडून पलायन केले. या आरोपींचा शोध घेण्यासाठी सांगली पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. हे दोघेही कोरोनाबाधित असल्याने पोलीस आणि प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.